इंदापूरच्या ओझरेत तिघा कोंबड्या चोरांना गावकऱ्यांसह पोलिसांनी ताणून ताणून पकडले ! गावकऱ्यांसह तिघे चोरटे जखमी

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील ओझरे गावात मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच चोरट्यांच्या टोळीला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवलाय.चोरटे घरात घुसून कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी घरमालकांवर दांडक्याने हल्ला केला, त्यांच्या खिशातील 4 हजार 100 रुपये हिसकावले.
मात्र आरडाओरड झाल्यामुळे गावकरी जागे झाले.पोलीस ही दाखल झाले गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत निरा नदीच्या बंधाऱ्याजवळून तिघांना जेरबंद केलय मात्र या पाठलागात या तीन चोरट्यांना गावकऱ्यांनी चांगला चोप दिला,तर दोन आरोपी फरार झाले पोलीस त्यांचा शोध घेताहेत.
या घटनेत या चोरट्यांनी हल्ला केल्यामुळे मालोजीराजे शिंदे, सागर रास्ते आणि उल्हास शिंदे हे ओझरे गावचे ग्रामस्थ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर गावकऱ्यांनी चोप दिल्यामुळे जखमी झालेल्या या चोरट्यांवरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकण यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि 30 मे 2025 रोजी इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बावडा दुरक्षेत्र हद्दीत ओझरे गावात मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास मालोजीराजे वसंतराव शिंदे वय ५० वर्षे रा. ओझरे हे घरामध्ये झोपले होते. त्यावेळी त्यांना बाहेर कोंबडयाचा आणि कुत्राचा भुंकण्याचा आवाज आला.त्यामुळे त्यांनी घरातुन खाली येवुन पाहणी केली यावेळी शिंदे यांना चार ते पाच लोक कोबंड्या चोरताना दिसले.
यास शिंदे त्यांनी प्रतिकार केला असता त्या लोकांनी शिंदे यांना हातातील दांडक्याने मारहाण केली.या झटापटीत शिंदे यांच्या खिशातील 4 हजार 100 रूपये त्यांनी बळजबरीने काढुन घेतले. त्यावर या अज्ञात चोरट्यांनी पळ काढला.मालोजीराजे शिंदे यांनी घरातील व गावातील लोकांना बोलावुन त्यांचा पाठलाग सुरू केला. याच दरम्यान त्यांनी पोलिसांच्या 112 या अति तात्काळ सेवेला कॉल करून याची माहिती दिली. काही वेळातच इंदापूर 112 चे पोलिसांचे पथक ओझरे गावात दाखल झाले.
गावकरी आणि पोलिसांच्या पथकाने या चोरट्यांचा निरा नदिचे बंधाऱ्यापर्यंत पाठलाग केला. याच वेळी गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी हे चोरटे त्यांच्याकडील गलोर च्या माध्यमातून गावकरी आणि पोलिसांच्या दिशेने दगड मारत होते. तर काही हाताला सापडतील असे मोठे दगडही ते फेकून मारत होते. या घटनेत गावातील ग्रामस्थ स्वतःला वाचवताना शेतीच्या बांधावरून आणि बंधाऱ्यावरून घसरून पडून मालोजीराजे शिंदे, सागर रास्ते आणि उल्हास शिंदे जखमी झाले.
या घटनेचे शेतकऱ्यांनीही त्यांना प्रतिकार केला यामध्ये तीन चोरटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सुनित बिजु चव्हाण, अर्जुन बिजु चव्हाण आणि विजु रामा चव्हाण अशी त्यांची नावे असून हे सर्व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सवत गव्हाण या ठिकाणचे रहिवासी आहेत. तर काल्या सुनिल काळे आणि सुभाष राजु चव्हाण यांसह इतर काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
सदर कारवाईमध्ये स्थानिक नागरिक मालोजीराजे वसंतराव शिंदे, अभिषेक वजीर मिसाळ,श्रीवर्धन मालोजीराजे शिंदे,अभिषेक संजय रास्ते, पांडुरंग विठठल शिंदे,वजीर भिमराव मिसाळ,पोलीस पाटील रास्ते व इतर गावातील लोकांनी मदत केलेली आहे.
तर पो.हवा.केदारनाथ बिडवे,पो.कॉ.राहुल पाटील,पो.कॉ.सलगर, पो.कॉ.गुरव, पोलीस मित्र सुरज पोटफोडे यांनी घटनास्थळी जावुन मदत केली. घटनास्थळास पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, पो.हवा.लखन साळवे, चालक पो.कॉ.साळवे,सहा.पोलीस निरिक्षक शंकर राऊत, पो.कॉ.वाणोळे यांनी भेट दिली.
या बाबत पोलीस स्टेशनला गु.रजि.नंबर ३८६/२०२५ बी.एस.एस. कलम ३१० (२) प्रमाणे दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक शंकर राऊत हे करीत आहेत.
What's Your Reaction?






