ठरलं तर ! जरांगे पाटलांना समर्थन दर्शवण्यासाठी इंदापुरातून हजारो बांधव जाणार मुंबईला
आय मिरर
मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होताना दिसत असून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमधून 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटलांच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी इंदापूर तालुक्यातून हजारो मराठा समाज बांधव हे मुंबईत दाखल होणार याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबईत जाऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी इंदापूर प्रशासकीय भवनाच्या शेजारील मैदानात नियोजित वाहनांचे सकल मराठा समाजाच्या वतीने पूजन करण्यात आले आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा,कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी महिलांची देखील उपस्थिती होती.
इंदापूर तालुक्यातून 24 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आपापल्या वाहनाने मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. जरांगे पाटील हे त्याच दिवशी पुण्यात दाखल होत असून दुपारच्या विश्रांतीच्या स्थळी इंदापूर मधील मराठा समाज बांधव त्या ठीकाणी जावून सहभागी होऊन जरांगे पाटलांसोबत पुढे मुंबईला मार्गस्थ होणार आहेत.
जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यासाठी मुंबईला जाताना आपापल्या जीवनावश्यक साधनांची प्रत्येकाला व्यवस्था करायची असून इंदापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपापल्या वाहनांसह या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?