नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील - हर्षवर्धन पाटील

Sep 5, 2023 - 18:55
 0  423
नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील - हर्षवर्धन पाटील

आय मिरर

इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या निरा नदीचे पात्र व नदीवरील बंधारे सध्या कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. त्यामुळे नीरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडण्याचा विषय आपण शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला असून, नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.4) केले.

निरवांगी नजीक दगडवाडी येथील प्राचिनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते म्हणाले, सणसर कटसाठी त्याकाळी 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र त्यामधून 22 गावांच्या शेतीला खडकवासल्याच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. भाटघरचे 4 टीएमसी पाणी कमी करून ते खडकवासल्यातून देण्याची व्यवस्था सणसर कट म्हणून करण्यात आली आहे. या सणसर कट मधून 22 गावांसाठी हक्काचे 4 टीएमसी पाणी मिळावे असा विषय मी शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. या 22 गावांना सणसर कट मधून 4 टीएमसी पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. 

श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदिर हे इंदापूर तालुक्याचे वैभव असून या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 30 लाख रुपये निधी मी जीर्णोद्धारासाठी जाहिर केला असून त्यामध्ये एक रुपयाही कमी होणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

चांगला दमदार पाऊस होऊन सर्व जनतेला सुखी समाधानी राहू दे, असे साकडे नंदिकेश्वर चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष यांना लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, प्रदीप पाटील आदी अनेक मान्यवरांसह कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भीमा कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow