“अजित दादांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी” मंत्री दत्तात्रय भरणे

Apr 20, 2026 - 11:18
Apr 20, 2026 - 11:20
 0  11
“अजित दादांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी” मंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर

“अजित दादांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली; त्यांचा विचार पुढे नेऊ” असे भावनिक आवाहन करत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये सुमारे 1500 सायकलींचे वाटप केले.

इंदापुरातील भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की, “आज तुमच्या आशीर्वादामुळे मी राज्याचा कृषिमंत्री म्हणून काम करत आहे. सर्वांना मदत कशी होईल यासाठी माझी भूमिका नेहमीच राहिली आहे.” त्यांनी यापूर्वी साडेपाच कोटी रुपयांच्या साहित्याचे वाटप केल्याची माहिती दिली.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत सांगितले की, “दादा दगडातून पाणी काढणारे नेते होते. सायकल वाटपाचा निर्णय घेताना त्यांनी इंदापूरला प्राधान्य दिले होते. त्यांच्या जाण्याने इंदापूर-बारामतीसह राज्याची मोठी हानी झाली आहे.”

शिक्षणाच्या क्षेत्रातही तालुका पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत भरणे यांनी इंदापूरमध्ये 16 शैक्षणिक लॅब देण्याची घोषणा केली. “शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी कुटुंबातील नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “आई-वडिलांची सेवा जिवंतपणी करा, त्यांच्या भावनांचा आदर ठेवा,” असा संदेशही त्यांनी दिला.

या उपक्रमामुळे इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सायकल वाटपामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती मिळणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow