Ground Report कोण होणार इंदापूरचा नगराध्यक्ष ? इंदापुरात पाटील : मानेंच्या युतीची चर्चा ? शहांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष...
आय मिरर
पुण्याच्या इंदापुरात कायम हर्षवर्धन पाटील विरुद्ध कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अजित पवार असा टोकाचा राजकीय संघर्ष राहिलाय. त्यामुळे होऊ घातलेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत इंदापूर नगर परिषदेवरती कोण एक हाती सत्ता स्थापन करणार आणि कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.
पुण्याच्या इंदापूर तालुक्याचं राजकारण कायम राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलंय. या ठिकाणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असलेलं राजकीय विळया भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवारांचे इंदापूरचे उमेदवार विद्यमान कृषिमंत्री दत्ता भरणेंकडून सलग तिसऱ्यांदा पराभव झाला. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत.
विशेष करून इंदापूर नगर परिषदेवर हर्षवर्धन पाटील यांची सलग तीन टर्म सत्ता राहिली आहे. विधानसभेच्या पूर्वी आणि विधानसभेच्या नंतर हर्षवर्धन पाटील यांचे काही जवळचे कार्यकर्ते पाटलांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठात गेले आहेत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना आपली सत्ता कायम राखण्यासाठी पाटील यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडीचे पाटलांचे संकेत...
तब्बल तीन साडेतीन वर्षाहून अधिक काळ रखडलेली इंदापूर नगर परिषदेची निवडणूक आता पार पडतेय. अनेक इच्छुक पायाला चाळ बांधून मैदानात उतरलेत.तर कार्यकर्त्यांना विजयाचा गुलाल लावण्यासाठी नेतेमंडळी देखील सज्ज झालीत. इंदापुरात फोडाफोडीचे राजकारण सुरू झालं असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी ज्याच्या त्याच्या सोयीने कोण जात असतो कोण येत असतो तुम्हाला लवकरच कळल तालुक्यात अजून काय काय होतंय असं म्हणत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे संकेत दिलेत.
हर्षवर्धन पाटील यांनी हे विधान केलं असतानाच इंदापुरात राष्ट्रवादी पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या स्थानिक युतीची चर्चा ही जोरदार सुरू आहे. त्याचे कारण तालुक्याच्या अर्थकारणाची नाळ असलेल्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजप नेत्यांचा केलेलं तोंड भरून कौतुक.
2024 च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने हे समोरासमोर...
च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने हे समोरासमोर लढले. यात हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने या दोघांचाही पराभव झाला. त्यामुळे इंदापुरात मंत्री भरणेंना थांबवण्यासाठी कोणा एकट्याचं काम नाही हे दोघांच्याही चांगलंच लक्षात आलंय आणि त्यामुळेच इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पाटील आणि मानेंच्या युतीची चर्चा सुरू झालीय. मात्र अशा युती वरती वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील असं प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.
विषय इथेच संपत नाही,2017 साली झालेल्या निवडणुकीत इंदापूर नगराध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकला. अंकिता मुकुंद शहा या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या. मिळालेल्या संधीचा उपयोग करत इंदापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शहा परिवाराकडून झालं. मात्र मागील काही वर्षापूर्वी शहा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय मतभेद झालेत.
इंदापूरच्या राजकारणात शहा परिवाराला एक राजकीय महत्त्व असून शहरवासीयांसोबत भावनिकतेच नातं आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या संस्थांवर शहा परिवाराने नेतृत्व केलय. भरत शहा यांनी इंदापूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलेय.मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंह दर्शन घेत शहा परिवाराने निवडणुकीचे रणसिंग ही फुंकले असून आता फक्त शहा कोणाची साथ घेणार याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत.
तर दुसरीकडे राज्याचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मतदार संघातील ही नगरपरिषद असल्याने त्या नगरपरिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ही मैदानात असेल.
- 2017 साली इंदापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती.
- इंदापूर नगर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष काँग्रेसच्या चिन्हावरती जनतेमधून निवडून आला.
- त्यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये होते.
- 2017 नंतर 2019 ला हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेच्या तिकिटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडली आणि भाजपात गेले.
- आता 2024 ला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत.
- नवीन रचनेनुसार इंदापूर नगर परिषदेला 20 नगरसेवक आणि 21 वा नगराध्यक्ष असे 21 उमेदवार आहेत.
- 2017 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला नगराध्यक्ष हा इंदापूरच्या शहा कुटुंबातील होता.(सौ.अंकिता मुकुंद शहा काँग्रेस)
- इंदापूर नगरीचे शेठ म्हणून ओळख असणारे भरत शहा आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या एकाच पक्षात आहेत.
- मात्र दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याने दोन्ही घराणी एकमेकांपासून दुरावली गेली आणि दोघांचीही ताकद काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे.
याशिवाय इंदापूर नगर परिषदेच्या या निवडणुकीत ठाकरेंची सेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आंबेडकरी संघटना, मनसे यांसह इतर लहान मोठ्या संघटना यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार कोण आहेत यावरती ही एक नजर टाकूया...
- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- भरत शहा, माजी उपनगराध्यक्ष इंदापूर
- अरविंद वाघ, माजी उपनगराध्यक्ष
- वसंतराव मालुंजकर, उद्योजक
- बाळासाहेब ढवळे,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
- अमर गाडे,माजी नगरसेवक
- शेखर पाटील, माजी नगरसेवक
- कृष्णा ताटे, माजी उपनगराध्यक्ष
- महादेव सोमवंशी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- किरण गानबोटे, शहराध्यक्ष भाजपा
इंदापूर विधानसभेसह इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेहमीच हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गट यांच्यामध्ये आमने-सामने लढाई पाहायला मिळाली. 2017 साली झालेल्या इंदापूर नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद काँग्रेसने पटकावले तर नगरसेवकांच्या नगरसेवकांच्या संकेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एका संख्येने आघाडीवर होती. मात्र नंतरच्या पाच वर्षाच्या कालखंडात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संगणमाताने इंदापूरचा कारभार केला.
यंदा मात्र चित्र उलट आहे सध्या हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. तर निवडून आलेला नगराध्यक्ष असणारा शहा परिवार ही सध्या हर्षवर्धन पाटलांपासून दुरावला गेलाय. सध्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मंत्रीपद भूषवणारा आमदार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीतही अजित पवार गटाविरुद्ध हर्षवर्धन पाटील आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल.यात मंत्री भरणे यांना रोखणं हेच विरोधकांपुढे आव्हान असेल आणि म्हणूनच या ठिकाणी अजित पवार गटाला रोखण्यासाठी पाटील आणि माने एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?