लोकसभेत खा.सुप्रिया सुळेंचे निलंबन झाले इंदापूरात एनसीपी शरद पवार गटाने भाजपाचा निषेध नोंदवला ; वाचा सविस्तर
आय मिरर
लोकसभेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे, खा अमोल कोल्हे व खा मोहम्मद फैजल यांच्या सह १४१ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केल्याने इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करून इंदापूरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
यावेळी बोलताना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे,खा मोहम्मद फैजल यांच्यासह राज्यसभा आणि लोकसभेतील एकूण १४१ खासदारांचे निलंबन केले गेले आहे. भाजप सरकारची या देशात हुकूमशाही चालू आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या भाजप सरकारचा निषेध करतो.
पुढे बोलताना महारुद्र पाटील म्हणाले की देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईडी व सीबीआय सारख्या संस्थांच्या मार्फत विरोधी पक्षातील खासदार व आमदारांवरती धाडी टाकत मानसिक पिळवणूक केली जात आहे. देशातील प्रत्येकजण भाजप मुळे दबावाखाली व भीती खाली आहे. देशात हिटलरच्या शाही चालू होती की काय असा लोकांचा समज झाला आहे. त्यामुळे या देशासाठी संसदेत आवाज उठवणाऱ्या खासदारांचे निलंबन केल्याबद्दल मी भाजप सरकारचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर, महिला शहराध्यक्षा रेश्मा शेख,बाळासाहेब चितळकर, दत्तात्रय रासकर,विकास खिलारे, गफूरभाई सय्यद, अनिल ढावरे, समरभाई सय्यद, श्रीकांत मखरे, अमोल भिसे, किसन जावळे उपस्थित होते.
What's Your Reaction?