माढ्याचा तिढा कसा सुटणार? मोहिते-निंबाळकर वादात शरद पवार नवा डाव टाकणार

Mar 19, 2024 - 11:50
 0  1221
माढ्याचा तिढा कसा सुटणार?  मोहिते-निंबाळकर वादात शरद पवार नवा डाव टाकणार

आय मिरर

माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे मोहिते पाटील गटात नाराजी व्यक्त होत आहे.

यातून रविवारी मोहिते पाटील गटाने बैठक घेतली, मात्र मोहिते पाटील यांच्या दबावापुढे भाजप नेते झुकणार? का मोहिते -पाटील यांना वेगळे आश्वासन देऊन लोकसभेचा मार्ग सुकर करणार? याकडे लक्ष लागले आहे. नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यासाठी माढ्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दाखल झाले होते, पण मोहिते -पाटील यांची नाराजी परवडणारी नसल्याचं स्पष्ट करत यावर तोडगा भाजपचे ज्येष्ठ नेते काढतील असं महाजनांनी सांगितलं.

निंबाळकर-मोहिते वाद कशावरून?

माढा लोकसभा मतदार संघात कुरघोडीचे राजकारण सुरू झालं असल्याचे दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदान संघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती, यावेळी मोहिते पाटील गटाने निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. माळशिरस विधानसभा मतदार संघातून खासदार निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली, यामुळे निंबाळकर विजयी झाले. यानंतर मतदार संघात विकास कामाचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून मोहिते पाटील गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटाने मागणी केली होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः मोहिते-पाटील यांची भेट घेईन असं सांगितलं.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते-पाटील गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. उमेदवार बदलावा अशी मागणी करण्यासाठी मोहिते पाटील यांच्याकडून भाजपवर दबाव येऊ लागला. रविवारी मोहिते पाटील गटाने अकलूज येथे बैठक घेतली मात्र संबंधित विषयावर रामराजे निंबाळकर यांच्यासहीत थेट भाष्य करण्याचे टाळलं.

माढ्यात शरद पवारांचं लक्ष

माढा लोकसभा मतदार संघाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केलं असून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील किंवा बाबासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची हालचाल सुरू केली आहे. या अगोदर दोन वेळा माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे आता पुन्हा हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपवर दबाव टाकण्यासाठी मोहिते-पाटील गटाने रविवारी अकलूज येथे बैठक घेतली यानंतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीस जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे आता जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागलं आहे . मोहिते-पाटील वेगळी भूमिका घेतील आणि सकारात्मक घडामोडी घडतील, असा आशावाद रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. एकदा झेंडा हाती घेतला इतर विषय संपतात असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक कोणीतरी नाराज होणार पण मोहिते -पाटील पक्षाची शिस्त पाळतील. रणजितसिंह नाईक निंबाळकर चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असं सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow