इंदापूरच्या बेलवाडीत मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा एकवटला ! जय महाराष्ट्र चौकात केलं लाक्षणिक उपोषण
आय मिरर
मराठा समाजाला ओबीसी मधून 50 टक्क्याच्या आतून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून विविध गावांमध्ये आमरण उपोषण,साखळी उपोषण करून जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवलं जात आहे. तर काही ठिकाणी रास्ता रोको केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावामध्ये जय महाराष्ट्र चौकात मराठा समाज एकवटला असून गुरुवारी दि.02 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.या एकदीवसीय लाक्षणीक उपोषणात महिला पुरुष तरुण युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे.आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली असून लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल,मराठा समाजाने शांततेत आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे .त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील विविध गावात कॅण्डल मार्च देखील काढले जात आहेत. तर इंदापूर तालुक्यातील कांदलगाव, पळसदेव, इंदापूर अकलूज रोड वरील बावड्या शेजारील बागल फाटा आणि इंदापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या बाहेर लाक्षणीक स्वरूपात आमरण उपोषण केली जात आहेत.याशिवाय बेलवाडीसह तालुक्यातील इतर अनेक गावात मराठा समाज बांधव आमरण उपोषणाला बसले असून सरकारने तात्काळ मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांकडून सरकारने 40 दिवसाचा वेळ घेतला होता मात्र 24 ऑक्टोबरला चाळीस दिवसाचा अवधी पूर्ण होऊन देखील सरकारने आरक्षणाचा तिढा सोडवलेला नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक होत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर आज राज्य सरकारचे एक शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असणाऱ्या उपोषण स्थळी जाऊन भेटणार आहे. थोड्याच वेळात हे शिष्ट मंडळ त्या ठिकाणी दाखल होईल. त्यामुळे आता तरी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यात सरकार यशस्वी होईल का हे पहावे लागणार आहे.
What's Your Reaction?