अजित पवार भाकरी फिरवण्याच्या तयारीत ! मंत्रिमंडळात दत्ता भरणेंसह या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता

Nov 29, 2024 - 17:25
Nov 29, 2024 - 17:37
 0  2809
अजित पवार भाकरी फिरवण्याच्या तयारीत ! मंत्रिमंडळात दत्ता भरणेंसह या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता

आय मिरर

महायुतीचे सरकारचा शपथविधी लवकरच होणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर आता मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी आतापासूनच अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला मर्यादीत मंत्रिपदं असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या वाट्याला 9 ते 11 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अजित पवार हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारी अजित पवार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

मागील महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या वाट्याला 9 कॅबिनेट मंत्रिपदं आली होती. त्यात आणखी दोनची भर पडून अजित पवारांना 11 मंत्रीपदं मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे एकून 41 आमदार निवडून आले आहेत. त्यात सर्व विद्यमान मंत्री विजयी झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा संधी मिळाली अशी त्यांची अपेक्षा आहे. असं असलं तरी मंत्रीमंडळात नवे चेहरे देण्याचा विचार अजित पवार करत आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

मावळत्या मंत्रिमंडळात दिलीप वळसे पाटील हे मंत्री होते. त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी नव्या मंत्रिमंडळात वगळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या ऐवजी इंदापूर मतदार संघातून विजयी झालेले दत्ता भरणे यांना संधी मिळण्याची चर्चा आहे. दत्ता भरणे हे अजित पवारांचे जवळचे समजले जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. या निवडणुकीत त्यांनी जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल असं बोललं जात आहे.  

वळसे पाटील यांच्या प्रमाणे संजय बनसोडे हे पण मावळत्या  मंत्रिमंडळात क्रीडामंत्री होते. त्यांनाही डच्चू दिली जाईल असं बोललं जात आहे. त्यांच्या ऐवजी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले राजकुमार बडोले यांना संधी दिली जाईल. बडोले यांनी या आधी ही फडणवीस सरकामध्ये मंत्रीपद सांभाळलं आहे. त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चर्चा आहे. त्याच्या बरोबर अहेरीतून विजयी झालेले मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांना ही वगळले जाण्याची चर्चा आहे. वळसे पाटील, संजय बनसोडे, आणि धर्मारावबाबा अत्राम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

जेष्ठ नेत्यांना वगळताना काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता एकमेव मुस्लिम महिला आमदार असलेल्या सना मलिक यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे, संग्राम जगताप आणि डॉ. किरण लहामटे यांचा मंत्रिपदासाठी विचार सुरू आहे. या सर्वांनी आपल्याला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहेत. मर्यादीत मंत्रिपदं आणि इच्छुकांची संख्या जास्त अशा वेळी कोणाला मंत्री करायचे याची तारेवरची कसरत अजित पवारांना करावी लागणार आहे.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow