आक्रोश मोर्चा काढणाऱ्या खा.कोल्हेंना शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादकांचा आक्रोश दिसत नाही का? जिल्हाध्यक्ष गारटकरांची खोचक टीका

आय मिरर
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात आक्रोश मोर्चा काढणारे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का?अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार २५ जानेवारी २०२४ रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी पुणे येथील नेहरू स्टेडियममध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.१८ जानेवारी रोजी मुंबई येथे महिलांचा मेळावा आयोजित केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्यांची स्थापना करणे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत नारायणगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.
गारटकर म्हणाले, खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकताच काढलेला आक्रोश मोर्चा हा एक राजकारणाचा भाग आहे. शेतकऱ्यांची खरंच काळजी असेल तर बंद पडलेल्या घोडगंगा साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आक्रोश मोर्चा काढावा.
शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही का? मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे अभिनेते असलेले खासदार डॉ. कोल्हे यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. ते आता उपमुख्यमंत्री पवार, वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधात आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील चार आमदार आमच्या सोबत आहेत. उपमुख्यमंत्री पवार हेच पुणे जिल्ह्याचा विकास करू शकतात. आमदार बेनके तटस्थ असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी त्यांनी मागणी केलेल्या विकास कामांना सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार बेनके आमच्या सोबत राहतील याची आम्हाला खात्री आहे. तालुक्याच्या विकासासाठी आमदार बेनके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत राहणे तालुक्याच्या हिताचे ठरेल.
यावेळी युवा नेते अमित बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, पापा खोत, सुप्रिया लेंडे, गुळुंचवाडीचे सरपंच अतुल भांबिरे, रामदास अभंग, अकिब इनामदार आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






