पुरंदर तालुक्यातील बेलसरच्या ग्रामस्थांनी दर्शवला महावितरणच्या 'या कामास विरोध'
आय मिरर
पुरंदर तालुक्यातील बेलसर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरान जमिनीवरून महावितरण आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला असून बेलसर ग्रामस्थ ही जमीन देण्यास तयार नाहीत. ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवून, कुठलाही पत्रव्यवहार न करता महावितरणने थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संधान साधून ४० एकर गायरान जमिनीची मागणी केल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. या कारभाराविरोधात महावितरणच्या या प्रकल्पास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
महावितरणच्या नियोजित प्रकल्पासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वाढलेली शेकडो आणि हजारो झाडे तोडली जात आहेत. पर्यावरणाचा मोठा समतोल बिघडवून केल्या जाणाऱ्या या वृक्षतोडीमुळे बेलसर ग्रामस्थांनी महावितरणच्या अंदाधुंद कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील पहिली लढाई बेलसर येथे झाली होती, त्यामुळे याच ऐतिहासिक स्मृती जपाव्यात म्हणून या गायरान क्षेत्रात भव्य 'शिवसृष्टी' उभारण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच ससूनच्या धर्तीवर याच गायरान क्षेत्रामध्ये भव्य जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशनात केली आहे.
असे असताना जनहिताचे हे महत्त्वाचे प्रकल्प बाजूला सारून महावितरणला जागा देण्यास ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये ही जागा महावितरणला दिली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
या सर्व प्रकाराबाबत संतप्त ग्रामस्थांनी जेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा व जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी अत्यंत अरवाच्च, उद्धट आणि धमकीवजा भाषेत संवाद साधल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "तुम्हाला काय करायचे ते करा," अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना धमकावल्यामुळे ग्रामस्थांमधील असंतोष अधिकच पेटला आहे.
महावितरणने बेलसर गायरानातील या प्रकल्पाचे काम तातडीने बंद केले नाही, तर संपूर्ण बेलसर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि प्रशासनाविरोधात उपोषणाला बसतील, असा जाहीर इशारा ग्रामस्थांच्या वतीने बेलसर गावचे माजी उपसरपंच धीरज जगताप यांनी दिला आहे.
What's Your Reaction?