कसलं आलयं बाईपणं भारी ? बिजवडीत रस्त्याच्या चारीत फेकलेल्या त्या लेकराची आई समोर आली नाही तर तिची कुस वांझोटी ठेव रे परमेश्वरा…

Dec 19, 2023 - 07:41
Dec 19, 2023 - 07:42
 0  2591
कसलं आलयं बाईपणं भारी ? बिजवडीत रस्त्याच्या चारीत फेकलेल्या त्या लेकराची आई समोर आली नाही तर तिची कुस वांझोटी ठेव रे परमेश्वरा…

आय मिरर

बाई पण भारी देवां...हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला प्रेक्षकांकडून त्याला दाद ही मिळाली पण इंदापूरात घटनेने मात्र महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.म्हणतात स्त्री जन्मा तुझी कहाणी..! हृदयी अमृत...नयनी पाणी ! पण हा जन्म येवढा सोपा हे बिजवडी मधील त्या घटनेने पुन्हा सिध्द केले.

हो इंदापूरच्या बिजवडीत असं काय घडलं की ज्यामुळे केवळ इंदापूरचं नाही तर अवघ्या राज्यातील माय माऊलींच्या काळजाला पिळ पडला पण त्या अभागी झालेल्या नकुशीच्या वैरीण झालेल्या आईला मात्र पान्हा फुटला नाही.ही घटना तुमच्या आमच्या घरातील नसली, तरी ती त्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहिले ते तुम्ही अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत. वाचा तर मग इंदापूरातील बिजवडीतून सुरू झालेला प्रवास ते सोलापुरात सुरु झालेल्या उपचाराची चित्तथरारक कहाणी…

शनिवारी दि.१६ डिसेंबर ला रात्री पुण्याच्या इंदापूरात प्रत्येकाची चिंता वाढवणारी घटना घडली. बिजवडी गावाच्या हद्दीतील वन खात्याच्या परिसरात रस्त्याच्या एका चारीत जन्म झालेलं जीवंत केवळ दोन तासाच महिला जातीच अर्भक कोणीतरी फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आलं आणि त्या नकुशीला वाचवण्यासाठी एकच धावाधाव सुरु झाली.

सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रशांत शिताप या घटनेचे साक्षिदार ठरलेत.शिताप म्हणतात की,दिवसभर शेतात काम करुन सायंकाळी घरी आलो आणि अंग टाकलं होतं. रात्रीचे जेमतेम आठ वाजले होते. तोच फोन वाजला अन् दादा लवकर या एवढे कानावर पडले. तो फोन होता खाकी वर्दीतली माय माउली माधुरी लडकत यांचा. काळजीवाहु आवाजात लडकत म्हणाल्या दादा बिजवडीच्या फॉरेस्ट मध्ये एका नवजात स्त्री बालकाला टाकून दिलेय..लवकर या…

डिसेंबरची हाडे गोठेनारी थंडी,वेळ रात्री आठची, कोल्हा कुत्र्याच भक्ष बनायला या नकुशीला टाकून देणाऱ्या माय माऊली चा मला संताप आला.पण त्या भक्षांपासून वाचवण्यासाठी भगवंताने आपल्याला हाक दिली असावी म्हणून एका क्षणात उठलो आणि रस्ता धरला.

घरातून एक शाल,वाटी चमचा आणि मेडिकल मधून आनलेला दूध पावडर चा डबा घेवून मी आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, महिला हवालदार माधुरी लडकत यांनी आनलेल्या दोन बाळुत्यांसह इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पोहचलो.आय सी यु मधून उपस्थित सर्व अस्वस्थ होऊन काचेतून आत डोकावत होते.पोलिस ही माणूस असतो आणि ही तर माणुसकीची बाप माणसं होती.दादा बाळ जगल पाहिजे, डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कालवा-कालव आवाजात स्पष्ट जाणवत होती.हे चित्र पाहून क्षणभर मी निशब्द झालो.

परिचारिका अंजली साबळे,उज्वला कदम,दाई कस्तुरी, शिदापुरे,महिला डॉ. ज्योती लांघी आणि डॉ. विनोद राजपूरे त्या हाडा मांसाच्या गोळ्याला चिकटलेले गवत,काटे,माती आणि खडे काढून स्वच्छ करत होते. बालरोगतज्ञ डॉ.सुहास सातपुते यांनी फोन केल्या बरोबर येवून योग्य उपचार देत बाळाची प्रकृती स्थिर केली.

गारठलेली सेवा 108 जीवदान नव्हे तर मृत्यूची वाट……

बाळाला डोक्याला खरचलेल्या जखमा असल्याने चांगल्या उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी या नकुशीला सोलापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. मग खरा अनुभव इथे आला.आपत्कालीन मदतीसाठी राज्य सरकारने रुग्णवाहिकेची 108 सेवा सुरु केली आहे.मात्र ही सेवा जीवदान देण्यासाठी नव्हे तर मृत्यूला कवटाळण्यासाठीच आहे असाच अनुभव आम्हा सर्वांना यावेळी आला.

चांगल्या उपचारासाठी सोलापूरसाठी घेऊन जाण्याकरीता पावणेनवू वाजता 108 ला फोन करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. भिगवन ची 108 रुग्णवाहिका जवळच्या अंतरावर होती. परंतु जवळ जवळ 10 मिनिट बिचारे चौकशीच करत होते.आई कोण ? पोलिस सोबत येतील का? यावरुन अतितात्काळ सेवा हीच का? असा प्रश्न पडला.पोलीस सोबत पाहिजे म्हणताच माधुरी लडकत यांनी तयारी दर्शवली त्यांच्या बरोबर सोबतीला सामाजिक कार्यकर्त्या वंदना कांबळे तयार झाल्या.

मात्र रुग्णवाहिकेला फोन करुन तब्बल दहा वाजल्या होत्या. सव्वा तासाचा काळ ओलांडला होता.तरीही रुग्णवाहिका भिगवन वरून यायला तयार नाही पुन्हा 108 ला फोन केला यंत्रणेकडून रुग्णवाहिका चालक /डॉक्टर यांचा नंबर आणि गाडी नंबर मागितला मात्र तोही मिळाला नाही. शेवटी 11 वाजता अतिशय तत्परतेने 108 ची रुग्णवाहिका इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात हजर झाली.

डाॅ.विनोद राजपूरे यांचं विशेष कौतुक…

मी डाॅ.विनोद राजपूरे यांचं विशेष कौतुक करतो. ते कौतुक यासाठी की बाळाच्या पोटातील घान काढून ऑक्सिजन लावून जवळ जवळ अडीच तास हा विठ्ठल तिच्याजवळ स्तब्ध खडा होता. तो ही या नकुशी च्या अर्थात भाग्य लक्ष्मी च्या रक्षणार्थ…सेवा देणाऱ्या नर्सेस डॉक्टर पोलिस आम्ही सगळेच भरल्या डोळ्यांनी तिच्या रडण्याची आणि ती स्थिर होण्याची वाट बघत होतो.डाॅ. राजपूरे,डाॅ. लांघि,डाॅ. सातपुते यांनी दोन तीन तासाच्या प्रयत्नाने बाळ धोक्याच्या बाहेर काढले आणि आमचा जीव जिवात आला.

हस्त रेषा पाऊल खुणा……

अलोकडे रील्स च्या जमान्यात लोक सोशल मीडिया वर आपल्या भाग्य लक्ष्मी ची पावलं नवीन घरात, नव्या घेतलेल्या दुचाकी अन् चार चाकी वर कुंकवात बुडवून उमतवता. माझ्या भाच्याने तर त्याच्या मुलीची पावले स्वतःच्या हाता वर गोंदवून घेतली होती. पण या नकुशीची ओळख काय? एम एल.सी. नंबर, स्त्री की पुरुष ?रुग्णालयातील रजिस्टर वर पायाचे हाताचे ठसे.अंगाला चिटकलेल्या खडे माती गवत काटे याच सँपल आणि बाळाची नाळं व इतर घानी ने भरलेली भरणी. हे पाहुन मन सुन्न सुन्न झालं.वाटलं काय नशीब असतं एखाद्याचं ! शेवटी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन रात्री 2 वाजता सोलापूर मधे हिच्या वर उपचार चालू झाले.

इंदापूरच्या बिजवडी परिसरात हे नवजात स्त्री अर्भक सापडलेय.त्या अभागी माय माऊलीला विनंती करतो की तुझी भाग्य लक्ष्मी सोलापूरात रुग्णालयात आहे. तिला फक्त आणि फक्त आई ची गरज आहे.तू समोर ये तिला स्वीकार,  अन्यथा तुझी कुस कायमची वांझ व्हावी ही त्या परमेश्वराला हात जोडून विनंती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow