इंदापूरातून जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देणार ; सर्वे करूनचं निर्णय घेणार - शरद पवार

आय मिरर
इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार ठरवू असे आश्वासन पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांनी गोविंद बागेत इंदापूरच्या कार्यकर्त्यांना दिले, पण त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत तालुक्यातही सर्वे करून त्यानुसार जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आपण घोषित करू असे सांगितले.
रविवारी 29 सप्टेंबरला बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते. ते शरद पवारांना भेटले आणि त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या पैकीच कोणालातरी उमेदवारी जाहीर करा ! आम्ही सर्वजण प्रचार करू असे सांगितले, मात्र बाहेरून आलेल्यांना आता उमेदवारी नको असा सूर लावला. त्यावर शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले.
गोविंद बागेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा बँके संचालक आप्पासाहेब जगदाळे, ऊन दशरथ माने,पक्षाचे तालुकाध्यक्ष ऍड तेजससिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, भरत शहा,महिला अध्यक्षा छाया पडसळकर, अमोल भिसे, अशोक घोगरे, सागर मिसाळ , कालिदास देवकर, चित्तरंजन पाटील, कर्मयोगीचे संचालक शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना माहिती दिली.
यावेळी दशरथ माने म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर सहा सात महिन्यात इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं. तुम्ही तुतारीचं काम करा आपले दिवस बदलणार आहेत आम्ही त्यांना सातत्याने सांगायचो. पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्वसामान्य झोपडीतील कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल पंचायत समिती सदस्य होईल. आज कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसापासून हा येतोय तो येतोय अशी चर्चा सुरू आहे.बुथ कमिट्या स्थापन करताना साधा माणूस मिळत नव्हता आम्हाला दोन मोठे विरोधक होते त्यांच्या तावडीतून वाचून आम्ही कसंतरी आलोय आम्ही तंबूत बसलोय आणि आमचा तंबूच तुम्ही घेऊन लुटून चालला आहात. आम्हाला तंबू तरी बसू द्या की ! लोकसभेपेक्षा इंदापूर तालुक्यात स्फोटक वातावरण आहे.कोणी जरी उभा राहिला तरी तो फक्त साहेबांच्या मुळे निवडून येणार आहे.आम्ही किती दिवस थांबायचं ? असा सवाल करीत तालुक्यात दुरंगी झाली आणि तिरंगी झाली तरीही आपला उमेदवारी 40 ते 50 हजार मतानेच निवडून येईल असा विश्वास मानेंनी व्यक्त केला फक्त आपण चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती केली.
आपल्याला सोडून गेले त्यांना घरी बसल्याशिवाय थांबणार नाही - जगदाळे
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की,गेले महिना झाले वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण मी कुठल्याही चर्चेत आतापर्यंत आलो नाही. काल आम्ही जेष्ठ एकत्र बसलो त्यावेळी तालुक्यातील लोकांचा खूप रोज निर्माण होऊ लागला आहे अशी चर्चा झाली त्यानंतर तुमच्याकडे येण्याचा निर्णय झाला. सहा पैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करू आणि चाळीस-पन्नास हजार मताधिक्याने आपला उमेदवार निवडून आणू. तुमचा जिथे अपमान होतो आम्ही सुद्धा तो अपमान सहन करणार नाही. जे जे ताईंना आपल्याला सोडून गेले त्यांना घरी बसल्याशिवाय थांबणार नाही.
तिसरा सक्षम पर्याय द्यावा - शहांची मागणी
भरत शहा म्हणाले की,इंदापूर तालुक्याला आपण तिसरा आणि सक्षम पर्याय द्यावा याच मागणीसाठी आम्ही सर्वजण इथे आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही ज्याच्या डोक्यावर हात ठेवाल तोच इंदापूर तालुक्याचा आमदार झाला. आता तुम्ही तिसरा आणि नवखा जर उमेदवार दिला तर तो तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे. त्यामुळे तुम्ही तिसरा सक्षम पर्याय द्यावा अशी मागणी शहा यांनी केली.
हर्षवर्धन पाटलांना पराभूत करण्यासाठी भरणेंना निवडणून आणले…
अशोक घोगरे म्हणाले की,जवळपास 82 सालापासून कॉलेज जीवनापासून मी आपलं काम करीत आहे. हर्षवर्धन पाटलांना पराभूत करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून आम्ही भरणे यांना निवडून आणले. पण तुमचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आम्हाला लगेच बाजूला फेकले. माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच भरणे यांना मतदान केले असे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आहेत. एवढे सर्व करत असताना आम्हाला कमी लेखू नका. ज्यांनी उमेदवारी साठी अर्ज केला आहे त्याचाही विचार झाला पाहिजे ते करत असताना आम्हाला आयुष्यभर विरोधात ठेवू नका. जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे अशी मागणी घोगरे यांनी केली.
What's Your Reaction?






