ऋतिकाला वाचवण्यात यश आलं मात्र परी आणि खुशी सोबत जे घडलं ते ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला...
आय मिरर
साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावाशेजारील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह 60 फूट खोल विहिरीत कोसळल्या.
या दुर्घटनेत खुशी दाजू ठाकरे (3) आणि परी संदीप गायकवाड (3) या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, तर ऋतिका संदीप गायकवाड या तिसऱ्या चिमुकलीला ग्रामस्थांनी वाचवले. अथक प्रयत्नांनंतर, घटनेच्या रात्री उशिरा खुशीचा मृतदेह सापडला, तर 24 तासांनंतर परीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. रविवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यात माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतात ट्रॅक्टरवर कांदा भरण्याचे काम सुरू होते. काम करणाऱ्या मजुरांची मुले ट्रॅक्टरवर खेळत होती. अचानक ट्रॅक्टर सुरू झाला आणि कठडे नसलेल्या 60 फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाच वर्षांखालील तीन चिमुकल्या खेळत होत्या. ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ मदतीसाठी धावले.
ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांनाही माहिती दिली. विहिरीत पडलेल्या खुशी ठाकरे (3) आणि परी गायकवाड (3) या दोघींचा शोध सुरू होता. मात्र, ऋतिका गायकवाड या 3 वर्षीय चिमुकलीला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधकार्यात, रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रोहित आणि भैय्या सरक या बंधूंनी पोहून खुशी ठाकरे हिचा मृतदेह शोधून काढला. त्यांना साक्री येथील पंकज मारणर, सुमित नागरे आणि गोकुळ परदेशी यांनी मदत केली. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टरही विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, तिसरी चिमुकली परी गायकवाड हिचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू ठेवले होते. अखेर 24 तासांनंतर, काल परीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोरीच्या साहाय्याने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?