इंदापुरात नीरा नदी काठच्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर, प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा आंदोलन

Nov 27, 2026 - 07:34
 0  29
इंदापुरात नीरा नदी काठच्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर, प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा आंदोलन

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात नीरा नदीचे पात्र कोरड ठाक पडल आहे. नीरा नदी पात्रात पाण्याचा थेंबही नसल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. इंदापूर तालुक्यातील जांब,कुरवली,उद्धट,चिखली यासह इतर गावातील शेतकरी आक्रमक झालेत.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलाय.उद्धट बंधाऱ्यातून नीरा नदी पात्रात आठ दिवसाच्या आत पिण्यासाठी पाणी सोडलं नाही तर उद्धट बंधारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

13 नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी नीरा नदीच्या पाण्यासाठी तब्बल तीन तासहून अधिक काळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अडवून धरला होता.

 जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 17 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची बैठक लावली जाईल असं आश्वासन दिल्यावर हा रास्ता रोको मागे घेतला होता,मात्र याला आता आठवडा ओलांडला तरी देखील निरा नदी पात्रात पाणी सोडलं नसल्याने शेतकरी आता आक्रमक झालेत.

नीरा नदीतील पाणीसाठा संपल्याने उद्धट, जांब, कुरवली आणि चिखलीसह नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या (लिंक पाच) उद्धट बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही त्याचा लाभ नदीकाठच्या गावांना मिळत नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जांब व कुरवली ग्रामपंचायतींनी संबंधित पाटबंधारे विभागाकडे निवेदने देऊन उद्धट बॅरेजमधून नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

मागील १५ ऑक्टोबरला बारामती परिसरात झालेल्या पावसाची नोंद १५८ मिलिमीटर इतकी झाली होती. या पावसाचे सर्व पाणी कऱ्हा नदीच्या मार्गाने उद्धट बॅरेजमध्ये येऊन मिळाले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी बॅरेजमध्ये जमा होऊनही उद्धट, जांब, कुरवली, चिखली आणि इतर खालच्या गावांना त्याचा कोणताही लाभ मिळाला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बॅरेजमध्ये पाणी उपलब्ध असताना नदीकाठची गावे मात्र पाण्यावाचून तहानलेली राहिली आहेत.

काही दिवसांपूर्वी सराटी येथे याच पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनातून अद्याप कोणताही ठोस मार्ग निघालेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत नदीपात्रातून पाणी सोडण्याऐवजी केवळ कालव्याद्वारेच पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती शासनाकडे केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

नदीकाठच्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यांना चालतो ; मग त्याच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातून पाणी सोडण्यास विरोध का, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्याने नदीकाठच्या गावांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उद्धट बॅरेजमधून नदीपात्रात तातडीने पाणी सोडावे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी जांब व कुरवली ग्रामपंचायतींनी निवेदनाद्वारे केली आहे.

पाणी कारखान्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी ?

नदीकाठच्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांना गाळपासाठी चालतो; मात्र याच नदीपात्रातून पाणी सोडण्यास विरोध का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. कालव्याद्वारे पाणी सोडण्याची भूमिका घेताना नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार का केला जात नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आता शासन आणि पाटबंधारे विभाग यावर काय निर्णय घेतात, याकडे उद्धट, जांब, कुरवली व चिखली परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow