Indapur तहसीलदार प्रकरणी दोन्ही मोर्चात काँग्रेस सहभागी नाही, मयूरसिंह पाटील यांनी मांडली काँग्रेसची भूमिका

Nov 24, 2026 - 07:44
 0  84
Indapur तहसीलदार प्रकरणी दोन्ही मोर्चात काँग्रेस सहभागी नाही, मयूरसिंह पाटील यांनी मांडली काँग्रेसची भूमिका

आय मिरर 

गेल्या काही दिवसापासून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे तर तहसीलदारांचं काम चांगलं आहे असं म्हणत अजितदादांची राष्ट्रवादी तहसीलदारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. उद्या 25 नोव्हेंबर रोजी इंदापूर तहसील कार्यालयावर भाजपा काही संघटनांच्या मदतीने तहसीलदारांच्या विरोधात मोर्चा तर अजितदादांची राष्ट्रवादी समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे.

सुरुवातीला तहसीलदारांच्या विरोधी मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता आता मात्र काँग्रेसने सावध भूमिका घेत या मोर्चामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.आंदोलन आणि समर्थन दर्शवणारे दोन्ही पक्ष सत्तेतील आहेत. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कृषिमंत्री देखील सत्तेतील आहेत.

एका तहसीलदारासाठी तालुका किती वेठीस धरायचा याच्या सर्व सीमा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ओलांडल्या आहेत. हे या तालुक्याला शोभणारे नाही,जर दोन पक्ष समोरासमोर आले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी उपस्थित केलाय.

या सर्व मुद्द्यांवरून मयूरसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आहेत. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधातील किंवा समर्थनार्थ होणाऱ्या कोणत्याही मोर्चामध्ये इंदापूर तालुका कॉंग्रेस पक्ष सहभागी होणार नाही.

इंदापूर तहसिलदार यांचे कार्यपध्दती बाबत जनतेमध्ये नाराजी आहे. त्यांची कार्यपध्दती ही लोकशाहीसाठी घातक आहे. ते विशिष्ठ हेतुने कोणाच्यातरी दबावाखाली काम करतात, त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा नाही किंवा आम्ही त्यांचे समर्थन करीत नाही. अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी काँग्रेस पक्ष उभा राहणार नाही. 

आम्ही या अधिकाऱ्याच्या विरोधातील भुमिका ज्यावेळी मांडली होती, त्यावेळीपर्यंत आयोजकांनी यामध्ये राजकारण आणले नव्हते. परंतु नंतर दोन्ही पक्षांनी त्याला राजकीय वादाची जोड दिली, हे दोन्हीकडुन चुकीचे आहे. 

ज्या पध्दतीने सत्तेमधील सत्ताधारी पक्ष राजकीय हेतुने प्रेरित होऊन 25 नोव्हेंबर रोजी आंदोलन करीत आहेत, या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था याला बाधा पोहोचणार आहे. 

आमची सर्व आंदोलन कर्त्यांना विनंती आहे की, जनतेला वेठीस न धरता तालुक्यातील शांततेसाठी दोन्ही बाजुने पक्षांनी, विविध संघटनांनी मोर्चे काढु नयेत व जनतेला व प्रशासनाला वेठीस धरू नये.

याउलट आम्ही सरकारला अशी मागणी करतो की, यासंबंधीत तहसिलदारांच्या बाबतीत निष्पक्षपणे चौकशी नेमुन, त्याद्वारे त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी. काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य माणुस केंद्रबिंदु मानुन काम केलेले आहे. याबाबतीत आम्ही इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेबरोबर आहोत.आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे प्रश्न कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता यापुढे लोकशाही पध्दतीने मांडत राहु असं काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow