दौंडच्या लडकतवाडीत अंगणवाडी शिक्षकेवर हल्ला,एकावर यवत पोलिसात गुन्हा दाखल
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे एका अंगणवाडी शिक्षिकेवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. 03 नोव्हेंबर 2026 रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी महेश दीपक होले याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अंगणवाडी शिक्षिका जयश्री रासकर यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.
घर खरेदीच्या व्यवहारातून महेश दीपक होले याने रासकर यांच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार केल्याची तक्रार यवत पोलिसात नोंदवण्यात आली आहे. दरम्यान तातडीने या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी रासकर यांनी केली आहे.
लडकतवाडी येथे महेश होले यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या पत्र्याच्या दोन खोल्या खरेदीचा व्यवहार जयश्री रासकर यांच्यासोबत झाला होता. या दोन खोल्या जयश्री रासकर यांनी खरेदी केल्या. दरम्यान कुटुंबासमवेत भांडण झाल्यानंतर महेश होले हा जयश्री रासकर यांनी खरेदी केलेल्या एका खोलीत राहण्यासाठी आला.
एक महिन्यापूर्वी होले याने जयश्री रासकर यांच्याकडे आपण खरेदी केलेली खोली मला परत द्यावी मी तुमचे पैसे देतो असा प्रस्ताव ठेवला. त्याला रासकर यांनी देखील सहमती दर्शवली.
दरम्यान तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश होले हा दारूच्या नशेत असताना जयश्री रासकर यांच्याशी त्याने वाद घातला असा आरोप असून याचवेळी त्याने मी तुला पैसे देत नाही काय करायचं ते कर असं म्हणत वाद घातला यावेळी झालेल्या झटापटीत महेश होले याने त्याच्याकडील कोयता उजव्या भुवईच्या खाली मारून आपल्याला जखमी केले अशी तक्रार जयश्री रासकर यांनी यवत पोलिसात नोंदवली आहे.
हल्ल्यानंतर पीडित महिलेने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेही न्याय व संरक्षणासाठी दाद मागण्यात आली आहे.
मात्र, पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अद्याप मोकाट फिरत असून तात्काळ त्याच्या अटकेची कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
What's Your Reaction?