मंदार किवळे गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी यवत पोलिसांकडून जेरबंद
आय मिरर
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरातील मंदार किवळे गोळीबार हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात दौंड तालुक्यातील यवत पोलिसांना यश आले आहे. प्रथमेश दीपक येणपुरे, वय १९ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडेठाण गावात आरोपी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यवत पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहा.पोलीस निरीक्षक सुधिर कदम, सहा.पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फनसे, पो.हवा संदिप देवकर,पो.हवा रॉकी देवकाते, पो.कॉ प्रतिक जगताप, पो.कॉ. धिरज जाधव, पो.कॉ. दिनेश लोणकर, पो.कॉ. विनित कुन्हाडे व पोलीस पाटील विठ्ठल बारवकर यांचे पथकाने केली आहे.
What's Your Reaction?