नीरा नदीत तातडीने पाणी सोडा ; पश्चिम भागातील शेतकऱ्यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी
आय मिरर
पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरिता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नीरा नदीतही वीर धरणातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
दुष्काळी परिस्थिती केवळ सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या धरणात जवळपास ८५ ते ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नीरा नदीत लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी दिला.
या मागणीचे निवेदन मा. श्री. दत्तात्रय मामा भरणे, आमदार यांना देण्यात आले. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. विलास माने, छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगरचे संचालक श्री. दत्तात्रय सपकळ, कळंब गावचे युवा नेते श्री. जय फडतरे, चिखलीचे सरपंच श्री. शिवाजी अर्जुन, श्री. दिलीप पांढरे, श्री. मारुती जाधव, श्री. मधुकर खरात, श्री. राहुल चव्हाण, कुरवलीचे सरपंच तसेच पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
नीरा नदीत तातडीने पाणी सोडून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, हीच सर्वांची प्रमुख मागणी आहे.
What's Your Reaction?