बिग ब्रेकिंग | बारामतीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना ; वाचा सविस्तर काय घडलं

Nov 6, 2026 - 06:45
Nov 6, 2026 - 06:56
 0  417
बिग ब्रेकिंग | बारामतीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना ; वाचा सविस्तर काय घडलं

आय मिरर 

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे.उपचारासाठी दाखल झालेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा साहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील वॉर्डमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रणजीत दत्तात्रय शितोळे असं मृत रुग्णाचं नाव असून, ते मद्याच्या दीर्घकालीन व्यसनाने त्रस्त होते. त्यांना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

दाखल होताना त्यांना रक्ताच्या उलट्या आणि फिट्स आल्याची माहिती नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली होती. त्यानुसार रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. मेंदूचा सीटी स्कॅन करण्यात आला, तसेच मानसोपचारतज्ज्ञ आणि ईएनटी तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता.

दरम्यान, रुग्णाची प्रकृती आणि वर्तणूक अस्वस्थ असल्याने नातेवाईकांना वारंवार माहिती देण्यात आली होती. रुग्णाजवळ नातेवाईकांनी थांबण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र, नातेवाईक रुग्णालयातून निघून गेल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

आज ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास रुग्णाने वॉर्डमधील पॅसेजच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर पडला.

घटनेची माहिती मिळताच रुग्णाचा शोध घेण्यात आला. तो गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर तातडीने अपघात विभागात हलवण्यात आलं. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणी एमएलसी नोंद करण्यात आली असून पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.मात्र, रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था आणि रुग्णाच्या देखरेखीबाबत आता नेमकी काय चौकशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow