दिवेआगार मधून सर्वात मोठी बातमी ! पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू
आय मिरर
पुण्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीतील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथे समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी परिसरातील आज सायंकाळी 5.30 वाजताचे सुमारास आळंदी, पुणे येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th या अकॅडमीचे 25 मुले, 17 मुली व 06 शिक्षक असे एकूण 48 विद्यार्थी व शिक्षक दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते.
समुद्राचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.
स्थानिक वॉटर स्पोर्ट्स मालकाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर...
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली. दिवेआगर येथील 'भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स'चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोध मोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या टीमने अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
पोलीस आणि प्रशासनाची घटनास्थळी धाव...
दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहे.
या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या काळात घडलेल्या या दुःखद घटनेने दिवेआगर व परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.
1) तन्मय दत्तात्रय वहीले
2) सुमित भरत अहिरे
3) प्रणव रामदास बनसोडे
4) कैवल्य सतीश वासनकर
5) राजवीर युवराज वहीले
6) यश किरण वानखेडे
7) सोहम तुकाराम भांडवलकर
8) कौस्तुभ संदीप दौंड
या विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
What's Your Reaction?