बारामतीत व्यवसायकाच्या गाडीवर गोळीबार ! दोन अल्पवयीन ताब्यात ; बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी
आय मिरर
बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यासोबत असलेला तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन गावठी पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंभोनगर परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांना गुरुवारी दुपारी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला होता. यावेळी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी कोळेकर यांच्या घराजवळ आले. घराचे गेट उघडून त्यांच्या वाहनावर दोन राऊंड गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयितांचा माग काढत पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर पाठलाग करून दोघां अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील अक्षय काळे हा तिसरा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. खंडणी मागण्यामागील नेमके कारण, गोळीबाराचे उद्दिष्ट आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार आणि बारामती तालुका पोलीस पथकाने केली.
गोळीबारासारख्या गंभीर घटनेनंतर अवघ्या १२ तासांत दोन आरोपींना अटक करून दोन गावठी पिस्तुले जप्त केल्याने बारामती पोलिसांच्या या तत्पर कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
What's Your Reaction?