कळस अंथुर्णे दगडवाडी परिसरातून शेतकऱ्यांचे पाण्याचे विद्युत पंप चोरणाऱ्या एकास वालचंदनगर पोलिसांकडून अटक
आय मिरर
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत कळस अंथुर्णे दगडवाडी या भागात शेतक-यांच्या विहीरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटरी चोरी करणाऱ्या एकाला वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. शंकर तायप्पा वाघमोडे याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चार पाणबुडी मोटरी व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली होंडा शाईन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या परिसरात सातत्याने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी होत होत्या याचा तपास करण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी पोलीस हवालदार गुलाबराव पाटील व पोलीस हवालदार शैलेश स्वामी यांना सुचना दिल्या होत्या.पोलीस हवालदार गुलाबराव पाटील व पोलीस हवालदार शैलेश स्वामी यांनी वालचंदनगर परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवून शंकर तायप्पा वाघमोडे वय २८ रा.लासुर्णे ता. इंदापुर जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने कळस अंथुर्णे दगडवाडी बारामती तालुक्यातील काटेवाडी भागात पाण्याच्या इलेक्टीक मोटरी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली असल्याची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
वाघमोडे याच्याकडुन ७.५ एच.पी ची १, ५ एच.पी ची १ व ३ एच.पी. च्या २ अशा एकुण ४ पाणबुडी मोटरी व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली होंडा शाईन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे सुचनेप्रमाणे स.पो.नि. व्हि. एन. साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाबराव पाटील व पोलीस हवालदार एस. एन. स्वामी, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा जामदार यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुलाबराव पाटील करीत आहेत.
What's Your Reaction?