वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय ?
आय मिरर
अशोक खरात बलात्कार प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
मात्र, राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले.
अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारणात ठिणगी पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर राजकीय हालचालींना वेग आला. रुपाली चाकणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया दिली.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "मी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष असतानापासून 'शिवलिका संस्थान'शी जोडले गेले. या ट्रस्टवर समाजातील अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्ती कार्यरत होत्या.
दरम्यान, ८ ऑगस्ट २०२५ रोजी माझा कार्यकाळ संपला होता, हे मी स्पष्ट करू इच्छिते. सामाजिक आयुष्यात आपण कोणाला तरी गुरु मानतो, त्या श्रद्धेतून मी तिथे शैक्षणिक आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. गुरुपौर्णिमेला केलेली पाद्यपूजा हा फक्त श्रद्धेचा भाग होता. मात्र, त्या व्यक्तीचे कृत्य इतके भयानक असेल, याची मला कल्पना नव्हती.
यासंदर्भातील बातमी ऐकून मला धक्का बसला आहे." पुढे चाकणकर म्हणाल्या की, "माझ्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तसेच माझी बदनामी केली, त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे", असा इशारही त्यांनी दिला.
What's Your Reaction?