कांदलगावच्या युवकांचे पंचायत समितीसमोर उपोषण आंदोलन,कामात गैरव्यवहाराचा आरोप ! चौकशीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून काम पूर्ण दाखविण्यात आलेल्या तेरा रस्त्यांच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सोमवारी दि.२८ आँगस्ट रोजी गावातील शेकडो युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास सुरवात केली मात्र प्रशासनाकडून चौकशीच्या आश्वासनानंतर सायंकाळी उशीरा उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
याबाबत युवकांनी मांडलेल्या भूमिकेनुसार सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत गावासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या १३ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर बहुतेक कामे केली नाहीत. ज्या ठिकाणी कामे झाली, ती देखील निकृष्ट दर्जाची; तर कुठे पूर्वी झालेल्या कामावरच पुन्हा एकाच रस्त्यावर नाव बदलून दोनदा कामे केल्याचे दाखविण्यात आले. पैसे मंजूर करणे, पूर्वी काँक्रिट केलेल्या रस्त्यावरच डांबरीकरण दाखविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीवरून कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून बिले लाटण्याचा प्रकार घडला आहे. तसेच, बिले घेताना फोटो एडिट करून ती कामे पूर्ण झाल्याचे दाखवून सुमारे ३९ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी फेब्रुवारी २०२३ मध्ये रस्त्यावर मुरूम टाकत असताना यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली. यावेळी मिळालेल्या माहितीमुळे हे प्रकरण उघडकीस आले. यामध्ये कांदलगाव ग्रामपंचायतीच्या हदीत रस्त्यांच्या १३ कामांना मंजूर मिळाली. त्या कामांसाठी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये मोठा भ्रष्टचार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी गावातील शेकडो तरुणांनी सोमवार पासून इंदापूर पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.दरम्यान या उपोषणस्थळी या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांनीही उपस्थिती लावली.
केलेल्या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, याबाबत ते निर्णय घेतील…… इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कांदलगाव येथील काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामांबाबत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाचे अभियंतासह प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी पाहणी केली. यामध्ये १३ पैकी ४ ते ५ कामे मंजूर ठिकाणी कामे न करता दुसऱ्या ठिकाणी केल्याचे समोर आले. तसेच, अशा सर्व कामाचे संनियंत्रण हे बांधकाम विभाग व जिल्हा परिषद करत असते. आम्ही केलेल्या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, याबाबत ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली आहे.
प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी…… आमच्या कांदलगाव येथे रस्त्याच्या कामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मिळवली आहे. त्यावरून गावात झालेले १३ रस्ते हे केवळ कागदोपत्री झाले आहेत. संबंधित रस्त्याचा निधी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.अशी मागणी आंदोलक उपोषणकर्ते समाधान जगताप यांनी केली आहे.
चौकशीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे… पुणे जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, काशिनाथ ननवरे, अँड. भालचंद्र कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून तीन त्रयस्थ अधिकान्यांच्या समितीमार्फत गावातील कामांची चौकशी करण्याबाबत रात्री उशिरा लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मुख्य कार्यकारी यांच्या आदेशाची प्रत तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेतले.
What's Your Reaction?