बारामतीत धक्कादायक ! काठ्या-गज-दगडांनी हल्ला केला,गाडीच्या काच्या फोडल्या ; कारण काय तर...

Dec 3, 2025 - 18:52
Dec 3, 2025 - 18:53
 0  3559
बारामतीत धक्कादायक ! काठ्या-गज-दगडांनी हल्ला केला,गाडीच्या काच्या फोडल्या ; कारण काय तर...

आय मिरर 

पुण्याच्या बारामतीत भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेल बाहेर चार चाकी पार्किंगच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून काठ्या व दगडांनी हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करत एकाला अटक केली आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी बारामतीच्या तानाई नगर मधील मानस पाटील हे त्यांच्या मित्र उदय, कुश, साहिल, मनिष, चैतन्य, ओंकार यांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. यावेळी पार्किंगवरून अनोळखी मुलांशी त्यांचा वाद झाला. 

त्यानंतर आरोपी देखील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बसले,मात्र दरम्यान त्यांनी फोन करून ८-१० जणांना बाहेरून बोलावले. मानस पाटील जेवण करून बाहेर येताच आरोपींनी अचानक काठ्या, लोखंडी गज आणि दगडांद्वारे त्यांच्यावर हल्ला चढवला. 

दगड फेकून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. मानस पाटील आणि त्यांच्यासोबतच्या मित्रांना मारहाण करण्यात आली. मानस पाटील यांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड आणि गजाने हल्ला करण्यात आला. 

पोलिसांना या बातमीची खबर लागतात स्वतः चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पावले उचलत पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले.फिर्यादींच्या जबाबासह हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर राम अनिल लोखंडे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.याशिवाय गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध घेतला जातोय.   

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, दिपाली गायकवाड पोलिस जवान जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांनी केली असून उपनिरीक्षक युवराज पाटील हे पुढील तपास करत आहेत.

एमआयडीसी परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. हॉटेल चालक-मालक, व्यावसायिक, नागरिक यांनी अशा गोष्टींची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अस आवाहन बारामती तालुका पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक शेखर यादव यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow