बालाजीचं दर्शन घेऊन निघाले;वाटेत काळ आडवा आला ! बारामतीच्या पती-पत्नीचा...
आय मिरर
गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना कार आणि ट्रकच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अशीच एक भीषण दुर्घटना समोर आली आहे.
बारामती शहरातील एक दाम्पत्य तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, दर्शनाहून परत येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती अनिल जगताप यांच्यासह कारमधील त्यांच्या पत्नी वैशाली जगताप यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बारामतीतील शहरातील शिवाजी नगर येथील जगताप कुटुंबीयांवर तिरुपती दर्शनाहून परतत असताना नियतीने घाला घातला. बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरातून आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज पहाटे ४.३० हुबळी राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अनिल जगताप यांच्या चारचाकी वाहनाची पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने जोरदार धडक बसली. या धडकेत अनिल जगताप हे जागीच मृत पावले. त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या वैशाली जगताप या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने हुबळीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,या वाहनात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यातील जगताप पती-पत्नी हे मृत झाले असून, त्यांच्यासोबत असलेली एक मुलगी जखमी झाली आहे,तर उर्वरित दोन जण सुखरूप आहेत. मात्र, या घटनेने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता पुरुष आणि गृहिणी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्ते महामार्गावरील अपघातांच्या वारंवार घडणाऱ्या घटना पुन्हा एकदा चिंताजनक ठरल्या आहेत. वाहनांचा अतिवेग, ओव्हरटेक करण्याची घाई आणि ड्रँक अँड ड्राईव्ह ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
What's Your Reaction?