दादांच्या जयंतीच्या निमित्ताने शिबिर घ्यावा लागेल असं वाटलं नव्हतं, इंदापुरातील आरोग्य शिबिरात मंत्री भरणे भावूक
आय मिरर
दादांच्या जयंतीच्या निमित्ताने शिबिर घ्यावा लागेल असे कधीही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, अजितदादा लढवय्या नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते. दादा सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारे होते.खऱ्याला खरं म्हणणारा आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात राहिला नाही. आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे आरोग्य शिबीर घेतोय मात्र ते वाढदिवसाच्या निमित्ताने घेता आलं असतं तर खूप बरं वाटलं असतं, दादांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या तालुक्यावर ही दुःखद वेळ आली अशा भावनिक शब्दात दत्तात्रय भरणे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
इंदापूर मध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महायज्ञ शिबिराचे उद्घाटन पार पडलं. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे दादांच्या आठवणीने काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळालं.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा,गटनेते शकीलभाई सय्यद,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी सभापती विलास माने,शहा ग्लोबल स्कूलचे संचालक मुकुंद शहा,माजी नगराध्यक्षा अंकिता शहा,चित्तरंजन पाटील,सचिन सपकाळ,कांतिलाल झगडे,मुख्याधिकारी रमेश ढगे यांसह विविध नगरसेवक, शासकीय विभागाचे अधिकारी डॉक्टर उपस्थित होते.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी नेहमीच लोकांना सांगत असतो की आरोग्याचे काम खूप महत्वाचे काम आहे.एखाद्या गरीब माणसाला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटते आपल्याला पुण्य लाभते.आरोग्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे.
दादांच्या जयंतीच्या निमित्ताने शिबिर घ्यावा लागेल असे कधीही वाटलं नव्हतं, दादा गोरगरीब माणसांसाठी काम करणारा नेता होता. खऱ्याला खरं म्हणणारा आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात राहिला नाही.दादांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या तालुक्यावर दुःखद वेळ आली.दादांनी अनेक रुग्णांना मदत केली.दादांचा विचार शिकवण घेऊन आपण आपल्या जीवनात वाटचाल केली पाहिजे.गरीब लोकांना या ठिकाणी घेऊन या त्यांना सेवेचा लाभ द्या त्यापेक्षा मोठी सेवा नाही.
आज अनेक रुग्ण विविध आजाराने त्रस्त आहेत.एखादा रुग्ण दवाखान्यात ऍडमिट केल्यावर आर्थिक अडचणी कशा येतात हे मी अनुभवले आहे.पुणे मुंबई या सारख्या शहरात मतदार संघातील गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी मी स्वतंत्र माणूस ठेवला आहे.मी एखाद्या रुग्णांना भेटायला जातो तेव्हा समजून येत की रुग्ण बरा व्हावा यासाठी त्या रूग्णालयात आस लावून बसलेल्या घरातील महिलांचे प्रमाण जास्त असते.दवाखान्याच्या बिलासाठी महिला दादादागिने मोडून दवाखान्याचे बिल भरतात.आपला माणूस व्यवस्थित व्हावा यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावण्याची तयारी असते.
नगराध्यक्षांच्या कार्याचं केलं कौतुक...
आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या योजना आणत आहे, त्या योजना योग्य लोकां पर्यंत पोहोचणे गरजेच आहे.शासन यासाठी काम करत आहे, मात्र त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.भरत शहा यांनी आज खूप मोठे कार्यक्रम घेतले आहेत,विविध आरोग्याच्या तपासण्या ते करणार आहेत.अवयव प्रतिरोपण हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे.
आज कैलासवासी गोकुळ शेठ शहा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, स्वर्गीय शंकरराव पाटील असतील, राजेंद्र कुमार घोलप असतील यांनी इंदापूर तालुक्यात खूप कामे केली.आपण देखील त्यांचा विकासाचा वसा पुढे घेऊन जात असून इंदापूर तालुक्याची विकासाच्या दृष्टीने घोडदौड सुरू आहे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात अधिक सुविधा कशा आणता येतील शिवाय इंदापूर तालुक्यात अत्याधुनिक रुग्णालय निर्माण करण्याची गरज आहे.इंदापूर शहरातील व्यंकटेश्वर मंदिराची खूप दिवसाची मागणी होती, आपण दोन कोटी रुपये दिले, नगराध्यक्ष भरत शहा आणि प्रशांत उंबरे यांची मागणी आली, त्यांनी मला एक कोटी मागितले मी त्यांना दोन कोटी दिले. अगोदरचे दोन कोटी आणि आताचे दोन कोटी.
इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार...
शहरातले प्रश्न आहेत काळजी करू नका कामे होतील.इंदापूर मधील गटार स्वच्छतेसाठी अत्याधुनिक सिवर सक्शन जेटिंग डी वॉटरिंग मशीन प्राप्त झाले आहे.येत्या काळात इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे,त्यामुळे उगाच कोणी इंदापूरला बदनाम करू नका. हळूहळू बदल होत आहे.वाढपी तुमच्या घरचा आहे, थोडे थोडे चिमटे काढा एकदम जास्त काढू नका. मी पण माणूस आहे.कुठेतरी कमी जास्त होत असेल पण आपण कामे करत आहोत.
महिलांना घरात जरा इंदापूरकरांचे वाजवा वाजवा म्हणजे काम सांगा.दोन वर्षाच्या आत तुम्हाला इंदापूर शहर संपूर्ण बदललेल दिसेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो.भविष्यात इंदापूर मध्ये चांगलं हॉस्पिटल आणि चांगलं हॉटेल निर्माण करणार आहोत.आम्ही फक्त बोलत नाही बोलत नाही म्हणजे आम्हाला समजत नाही असं नाही.तुम्ही काळजी करू नका.इंदापूर शहराला तरंगवाडी च्या पाण्याच्या बाबतीत लवकरच बैठक लावली जाईल एक पत्र तुम्ही द्या असं आश्वासन मंत्री भरणे यांनी दिले.
आरोग्य शिबिरात कोणत्या तपासण्या....
या आरोग्य शिबिरामध्ये 46 रुग्णांनी एन्जिओग्राफीसाठी नोंदणी केली. तीनशे रुग्णांच्या हृदयाची ईसीजी तपासणी करण्यात आली. 450 रुग्णांचा रक्तदाब 91 रुग्णांची रक्त तपासणी, 30 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली असून 400 रुग्णांना चष्मा वाटप केला जाणार आहे. 580 रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली असून १०० रुग्णांची विरोधक तपासणी तर 260 रुग्णांची कान नाक घसा तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 120 रुग्णांची मशीन द्वारे कानाची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 260 जणांची सिटीस्कॅन तपासणी केली जाणार असून त्यांची तशी पूर्व नोंदणी करण्यात आली आहे.
या महारुग्य शिबिरामध्ये इंदापूर क्रिटी केअर, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, मधील गिरीराज हॉस्पिटल, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, भारती हॉस्पिटल यासोबत पतंजली योग समिती, मेडिकेअर ब्लड बँक, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर, विश्वराज कराड हॉस्पिटल आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे. ज्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्यात आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत त्यांच्यासाठी आयोजकांकडून मदत केली जाणार आहे.
What's Your Reaction?