“युगेंद्र पवार आमदारकीसाठी इच्छुक? बारामतीतील संवाद बैठकीत व्यक्त केली खदखद”
आय मिरर
बारामती शहरातील महावीर भवन येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार यांनी पक्ष संघटन, बारामतीतील विकास, नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प, आगामी आंदोलनं आणि पक्षातील स्वतःच्या भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडताना अनेक मुद्द्यांवर भावनिक भाष्य केले. विधानसभेनंतर पक्षाकडून कोणतीही जबाबदारी न मिळाल्याची खंतही त्यांनी यावेळी उघडपणे व्यक्त केली.
“पवार साहेब हे पवार साहेब आहेत. त्यांच्यासारखं दुसरं कोणी होऊ शकत नाही आणि अजितदादा हे अजितदादा होते. त्यांच्यासारखंही कोणी होऊ शकत नाही,” असे सांगत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. “मला नवीन दादा व्हायचं नाही, मला युगेंद्र राहायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करणार,” असे ते म्हणाले.
“दादा गेले, पण मी तुमच्यासोबत आहे”
अजितदादांच्या जाण्यानंतर बारामतीकरांमध्ये निर्माण झालेल्या भावनिक पोकळीचा उल्लेख करताना युगेंद्र पवार म्हणाले, “दुर्दैवाने दादा आपल्याला सोडून गेले. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला की आता आपल्यासाठी कोण आहे? पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे आणि माझ्यासोबत अनेक लोक आहेत. आवश्यक तिथे आम्ही तुम्हाला मदत करू.”
शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असल्याचे सांगताना त्यांनी जानाई-शिरसाई योजनेचा उल्लेख केला. “ही योजना पवार साहेबांनी आणली आणि अजितदादांनी ती पुढे नेली,” असे ते म्हणाले.
पाणी, लोडशेडिंग आणि इंधन प्रश्नावर आंदोलनाचा इशारा
सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पुण्यात सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, मागणीनंतर पाणी सोडण्यात आले. मात्र, “अधिकारी ऐकत नसतील तर मोठं आंदोलन करावं लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील इंधनटंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस उपलब्धता आणि कांद्याच्या घसरलेल्या भावांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. “पेट्रोल-डिझेल चार रुपयांनी वाढलं आहे, पंपावर डिझेल मिळत नाही, कांद्याला भाव नाही. या सर्व प्रश्नांवर लवकरच मोठं आंदोलन उभं करू,” असे ते म्हणाले.
“मला पदासाठी राजकारण करायचं नाही”
आपल्याला मोठं पद नको असून बारामतीकरांमध्ये राहून काम करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मला कोणत्याही पदात अडकायचं नाही. जर राज्यस्तरीय पद मिळालं तर मला बाहेर प्रचारासाठी जावं लागेल आणि बारामतीला वेळ देता येणार नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विधानसभेनंतरची नाराजी उघड करताना म्हटले, “विधानसभेनंतर वाटत होतं की पक्षासाठी एवढं काम केलं, ८५ हजार मतं मिळाली, आता काहीतरी जबाबदारी मिळेल. पण काहीच मिळालं नाही. ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यांनाही विधान परिषद मिळाली, पण आमच्या वाट्याला काही आलं नाही.”
मात्र त्यानंतर त्यांनीच ही भूमिका समजून घेतल्याचे सांगितले. “कदाचित साहेबांना आमच्यापेक्षा जास्त कळतं. त्यांनी तो निर्णय विचारपूर्वक घेतला असावा. आज वाटतं, काही मिळालं नाही ते बरंच झालं, त्यामुळे मला बारामतीकरांना जास्त वेळ देता आला,” असे ते म्हणाले.
विलीनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “आपल्या पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. दादा होते तेव्हा त्यांची ती इच्छा होती, पण आता विलीनीकरण अजिबात होणार नाही,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
“मला कोणताही पक्ष तोडायचा किंवा फोडायचा नाही. मला फक्त पवार साहेबांचा पक्ष वाढवायचा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प हा अजितदादांचे स्वप्न असल्याचे सांगताना युगेंद्र पवार म्हणाले, “दादांनी कनेरीच्या सभेत या योजनेसाठी साधारण हजार कोटी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले होते. पण त्यांच्या अचानक जाण्यामुळे प्रकल्प रखडला.”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री असताना या प्रकल्पाची घोषणा केली होती, मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याने कामाबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले. “मी पवार साहेबांना भेटून या विषयावर मार्गदर्शन घेणार आहे,” असेही ते म्हणाले.
“बारामतीचा पाया पवार साहेबांनी बांधला”
बारामतीच्या विकासाचे सर्व श्रेय शरद पवार यांना देताना युगेंद्र पवार म्हणाले, “आज बारामतीत जे काही आहे त्याचा पाया पवार साहेबांनी बांधला आहे. त्यांनी कधी स्वतःचं मार्केटिंग केलं नाही. त्यांचं काम नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे.”
१९६७ सालची बारामती आणि आताची बारामती यातील बदल नव्या पिढीला समजावून सांगण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमसह अनेक प्रकल्पांची उदाहरणे देत त्यांनी पवार साहेबांच्या कामांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
“सत्ता नसताना साथ देणारा कार्यकर्ता खरा”
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक बूथवर कार्यकर्ते वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. “सत्ता आल्यावर ठेके देता येतात; पण काही नसताना जो कार्यकर्ता सोबत राहतो तोच खरा सच्चा कार्यकर्ता असतो,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी स्वतःकडे पीए न ठेवण्यामागचे कारणही सांगितले. “मला थेट कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवायचा आहे. तुम्ही लोकांना भेटायला आणा,” असे त्यांनी सांगितले.
“२०२९ किंवा कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता पक्ष वाढवण्यासाठी काम करा. येणारा काळ मला चांगला दिसतो आहे,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा शेवट केला.
What's Your Reaction?