हॅलो,मालक टेम्पोला अपघात ; सहा लाखांचं खोबरं पळवलं ! दौंड पोलिसांनी चौकशी करताच समोर आलं भलतचं प्रकरण
आय मिरर
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात टेम्पो अपघाताचा बनाव रचून तब्बल 6 लाख 68 हजार रुपयांच्या खोबऱ्याची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी वाहन चालकासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.चोरीस गेलेले 6 लाख 68 हजार रुपये किमतीचे 3615 किलो खोबरे जप्त केले आहे.
पोलिसांनी मनोज बनसोडे,दत्तात्रय लावरे,अनिकेत पवार आणि लक्षण जगताप अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून हे सर्व जण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आहेत.
कर्नाटकातील चिंकमंगळूर येथून पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन निघालेल्या आयशर टेम्पोमधील 3615 किलो खोबरे चोरीला गेल्याची माहिती वाहन चालकाने मालकाला दिली होती. मात्र घटनास्थळी पाहणी करताना दौंड पोलिसांना संशय आल्याने सखोल तपास सुरू करण्यात आला. चौकशीत चालक मनोज बनसोडे याने साथीदारांच्या मदतीने खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली.तसेच चोरीचा प्रकार लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक करत गुन्ह्यातील 6 लाख 68 हजार रुपये किमतीचे 3615 किलो खोबरे जप्त केले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कामगिरी दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने, महादेव जाधव यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?