त्यानं बारामती ॲग्रो कारखान्याच्या वजन काट्यासमोरून थेट ट्रॅक्टरच चोरला ! पण भिगवण पोलीस लईच डेंजर, पोलिसांनी त्याला नळदुर्ग मधून ताब्यात घेतला

आय मिरर
बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्यासमोरून महिंद्रा कंपनीच्या पाच लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील चोरट्याला भिगवण पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग मधून अटक केली आहे.सोमनाथ भारत शिंदे असं या आरोपीचे नाव असून तो इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिंदे वस्तीवरील रहिवाशी आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने महिंद्रा कंपनीचा एम.एच.४५ ए.क्यु.३२०७ या क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरी केला होता. यासंदर्भात अक्षय अनिल राऊत राहणार केतुर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ऊस वाहतूकदार शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीने भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी तात्काळ एक तपास पथक नियुक्त केले.
या तपास पथकाने विविध ठिकाणचे जवळपास शंभर सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी केली. दरम्यान पोलिसांनी या कामी आपल्या खोबऱ्याची ही मदत घेतली. त्यानंतर या पथकाने इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिंदे वस्तीवरील सोमनाथ भारत शिंदे या 23 वर्षीय व्यक्तीला दिनांक 3 मार्च 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथून ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला महिंद्रा कंपनीचा निओ मॉडेल्स चा पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर देखील हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देखमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभावी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, सचिन पवार, प्रमोद गलांडे यांनी केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले हे करीत आहेत.
What's Your Reaction?






