ब्राम्हणघरमध्ये भीषण वणवा ; शेतकऱ्यांचा जनावरांचा चारा जळून खाक, मोठे नुकसान

Apr 24, 2026 - 17:24
Apr 24, 2026 - 18:23
 0  98
ब्राम्हणघरमध्ये भीषण वणवा ; शेतकऱ्यांचा जनावरांचा चारा जळून खाक, मोठे नुकसान

आय मिरर (विशाल शिंदे)

भोर तालुक्यातील हिरडस मावळ परिसरातील ब्राम्हणघर (हि.मा.) येथे शुक्रवारी (दि. २४) अज्ञात व्यक्तीने डोंगराळ भागात लावलेल्या वणव्यामुळे मोठी हानी झाली आहे. अचानक पेटलेल्या या वणव्याने वेग घेत थेट मानवी वस्तीच्या दिशेने धाव घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत ब्राम्हणघर येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद डोईफोडे आणि सीताबाई तुळशीराम डोईफोडे यांचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील चारा जळून पूर्णतः नष्ट झाला आहे. यामध्ये सुमारे पाचशे पेंढे, चार ते पाच हजार गवताच्या पेंड्या, सातशे ते आठशे कडब्याच्या पेंड्या तसेच सरपण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

डोंगरावरून आलेल्या या वणव्याने अचानक वेग घेतल्याने तो थेट वस्तीपर्यंत पोहोचला. परिस्थिती गंभीर होताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर गावकऱ्यांनी एकजूट दाखवत मोठ्या प्रयत्नांनी वणवा आटोक्यात आणला. त्यामुळे सुदैवाने घरांचे नुकसान टळले, मात्र जनावरांसाठी साठवलेला चारा पूर्णतः जळून खाक झाला.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow