नेमकं काय घडलं? कोकणात पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार

Jun 14, 2024 - 16:11
 0  1242
नेमकं काय घडलं? कोकणात पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार

आय मिरर

सिंधुदुर्गमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक पीपीई किट घालून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अनेक जणं किरकोळ जखमी झाले आहेत. अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना वैभववाडी तिथवली येथे गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण वय 70 यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घरातून बाहेर काढला. यावेळी जवळपास 60 ते 70 ग्रामस्थ उपस्थित होते. विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता.

स्मशानभूमीत काही ग्रामस्थ सुकलेली लाकडे जाळून अंत्यसंस्कारासाठी विस्तव तयार करीत होते. स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत ऐनाच्या झाडावर काळंबा मधमाशांचे पोळे होते. मात्र झुडपामुळे मध माशाचा पोळा ग्रामस्थांना दिसला नाही. धुराचे लोट त्या मधमाशांच्या पोळाकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या.

उठलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटले. मधमाशांनी अनेक जणांना जखमी केले. मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंघावत होत्या.

मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. या मधमाशा जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत ग्रामस्थांचा पाठलाग करत होत्या. आता अंत्यसंस्कार कसे करायचे या विवंचनेते ग्रामस्थ पडले होते. अखेर अडीज तासानंतर ग्रामस्थांना आयडिया सुचली. कोरोना काळात आणलेली पिपीई किट उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आणण्यात आली. मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलाने किट घालून विधी पूर्ण केले. इतर चार ते पाच जणांनी पिपीई कीट घालून स्मशानभूमीत जात त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र घडलेल्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow