भावकी जीवावर उठली, तरुणाला गाडीने चिरडत कोयत्याने वार केले, 13 जण जखमी झाले

आय मिरर
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. दोन गटाने एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करत एकमेकांना जखमी केलं आहे.
या हल्ल्यात एकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे. तर अन्य १३ जखमी झाले आहेत. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या सर्वांवर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड भाऊबंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण अशाप्रकारे दोन गटात झालेल्या रक्तरंजित हाणामारीमुळे दातली गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडली. शुक्रवारी इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. दोन्ही गटांनी कोयता-कुऱ्हाड अशार धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सागर मारुती भाबड नावाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीने चिरडत नंतर त्याच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती समजत आहे.
या हल्ल्यात दोन्ही बाजुचे तब्बल १३ जण जखमी झाले आहेत. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या या घटनेन जिल्हा हादरला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिन्नर एमआयडीसी पोलीस तातडीने घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
What's Your Reaction?






