तिचा खून करून मृतदेह घरात पुरला ! प्रियकराचं प्रियसीसोबत भयानक कृत्य

आय मिरर
प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मोनिका सुमित निर्मळ (३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख इरफान शेख पाशा (३५) याला ताब्यात घेतले आहे.
जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. पतीपासून विभक्त राहणारी मोनिका ही जालना येथे माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगरला अपडाऊन करत होती. ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही. तिचा मोबाईल नंबरही लागत नव्हता, त्यामुळे चिंतातुर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
मोनिकाच्या मोबाईलवरून नातेवाईकांना मॅसेज
दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केले आहे. आता मी तुम्हाला एक वर्षानंतरच भेटायला येईन, अशा आशयाचा खोटा मेसेज आला. त्या मोबाईलवर फोन केला असता तो पुन्हा लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली. नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन याप्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासचक्रे गतीने फिरली.
मोनिकाचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर
इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही ६ फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती. लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता. शेतात असलेल्या पडीक घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते. दरम्यान, कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले. दरम्यान, इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून त्यानेच फाशी देऊन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा, असा अंदाज आहे.
दररोजच्या भेटीने जुळले प्रेमसंबंध
संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असे. दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान शेख पाशा (३५) हे चांगले परिचित होते. त्यातून ते एकमेकांशी बोलायचे. दररोजच्या भेटीमुळे या दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा अंदाज आहे.
सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स ठरला महत्त्वाचा पुरावा
पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासूर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली होती. मात्र, त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढून ते तपासले होते. मोनिका हिच्यासोबतचे तासन्तास केलेले मोबाईल संभाषण आणि ६ फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अखेर तोड उघडले.
What's Your Reaction?






