संजीवराजेंच्या घरावर IT ची धाड ! तर पुण्याच्या इंदापुरातही.... वाचा सविस्तर

Feb 5, 2025 - 22:13
Feb 6, 2025 - 06:35
 0  1907
संजीवराजेंच्या घरावर IT ची धाड ! तर पुण्याच्या इंदापुरातही.... वाचा सविस्तर

आय मिरर

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर  बुधवारी दि.05 फेब्रुवारी 25 रोजी आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे.आज सकाळी सहा वाजल्यापासून अशी छापेमारी सुरू होती. तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाईट डेअरी या खाजगी दूध उत्पादक संस्थेसह दोन व्यावसायिकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे.

आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती करण्यात आली.यावेळी बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बंगला परिसरात पोलिस पथक तैनात होते.

दुसरीकडे फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काही खाजगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची माहिती मिळतेय. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नेचर डिलाईट चे अर्जुन देसाई यांच्या घरी देखील आज सकाळी पहाटेपासूनच हे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत.मात्र कोणत्या खात्याचे हे अधिकारी आहेत हे अद्याप समजू शकले नाही,मात्र आयकर विभागाची ही धाड असल्याचा अंदाज लावला जातोय. 

रघुनाथराजे आणि संजीवराजे हे दोघे रामराजे यांचे चुलत बंधू आहेत.विधानसभा निवडणुकीआधी संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा टाकला असल्याचे बोलले जाते. आयटी विभागाच्या या कारवाईचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देसाई यांच्या घरी सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं.यासोबतच देसाई यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.सर्वसामान्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय.तर दुसरीकडे देसाई यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या मयूर जामदार यांच्या घरी देखील आज सकाळपासून तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तर अर्जुन देसाई आणि मयूर जामदार यांच्याशी निगडित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरी च्या ठिकाणी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळपासूनच पोहचले होते त्या ठिकाणी देखील कसून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार दूध प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी तपासणी व चौकशी केली जात असल्याची स्थिती असून अशा संदर्भातील तपासाची चर्चा आहेत. इंदापूर तालुक्यातही अशी तपासणी सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळत असून यासंदर्भात अद्याप संबंधित यंत्रणांकडून कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही.

राजकीय आकसाने कारवाई होत असल्याची समर्थकांची भावना...

फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थनात असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय घराणे शरद पवारांच्या पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले होते, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तटस्थ भूमिका घेत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वाच्यता केली होती.

भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभेच्या पराभवात फलटणच्या याच राजे घराण्याचा मोठा हातभार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर राजकीय आकसाने ही कारवाई होत असल्याची भावना रघुनाथराजे व संजीवराजे यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या घरी तपास यंत्रणाचे अधिकारी पोहोचले याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांची देखील तेथे गर्दी झाली.

 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow