इंदापूरच्या कांदलगावात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा ! दीड दोन महिन्यात जरांगे पाटील देणार भेट
आय मिरर
राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी हैदराबाद गॅझेट लागू करत मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या मान्य केल्यात. यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये बुधवारी 10 सप्टेंबर रोजी रात्री ग्रामस्थांनी हलगीच्या निनादात डीजेच्या तालावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.या उत्सवात गावातील लहान थोरांपासून महिला वर्ग ही सहभागी झाला होता.
गेल्या अडीच वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे.या कालखंडात अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलने केली. अंतरवाली सराटी पाठोपाठ मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमकतेने आंदोलन करणारे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कांदलगाव हे एक प्रमुख गाव आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कांदलगाव मधील सौदागर ननवरे आणि बंडू ननवरे या दोघा तरुणांनी मध्यंतरी आमरण उपोषण केलं होतं. कांदलगाव ग्रामपंचायतच्या समोर हे आमरण उपोषण करण्यात आलं होतं,याला गावातील सर्वच मराठा बांधवांनी मोठा पाठिंबा दर्शवला होता.
गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरू झालेली मराठा आरक्षणाची ही ठिणगी आज पर्यंत ज्वलंत ठेवण्याचं काम कांदलगाव मधून सातत्याने झालं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावात अनेक आंदोलने झाली,उपोषणे झाली मशाल मोर्चेही काढण्यात आले. ज्या ज्या वेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला हाक दिली त्या त्या वेळी कांदलगाव मधले तरुण आक्रमकतेने समाजासाठी धावून गेले.अगदी मागील वर्षी पहिल्या टप्प्यात मुंबईच्या वेशीवर चाल करण्यात ही कांदलगाव मधील आंदोलकांचा मोठा सहभाग होता.
यानंतर पाठीमागील आठवडाभरापूर्वी झालेल्या आझाद मैदानातील आमरण उपोषणात ही कांदलगाव मधील मराठा तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन ऑगस्ट रोजी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याबाबतचा अध्यादेश काढल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधवांनी विजय उत्सव साजरा केला.
त्याच पार्श्वभूमीवर कांदलगाव मध्ये बुधवारी 10 सप्टेंबर रोजी हा विजय उत्सव साजरा करण्यात आला.श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक पार पडल्यानंतर कांदलगाव मधील ग्रामपंचायत समोरील मुख्य चौकात छोटी आभार सभा पार पडली. यात आतापर्यंत मराठा आंदोलकांना हा लढा ज्वलंत ठेवण्यासाठी ज्यांनी सढळ हाताने मदत केली मार्गदर्शन केले अशांचे ऋण या सभेत व्यक्त करण्यात आले.
यावेळी नामदेव काशीद, बापू देवकर, गणेश बाबर पाटील,बंडू ननवरे आणि सौदागर ननवरे यांनी आज पर्यंतच्या या लढ्याबद्दलचा इतिवृत्तान्त सर्वांसमोर मांडला. विविध अनुभव आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आजपर्यंतचा हा लढा आपण सर्वांनी सुरू ठेवला असून भविष्यात देखील मराठा आरक्षणाची लढाई पूर्णपणे जिंकेपर्यंत कांदलगाव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल असा आत्मविश्वास या सर्वांनीच व्यक्त केला. तर पुढील दीड दोन महिन्याच्या अंतराने मनोज जरांगे पाटील हे कांदलगावला सदिच्छा भेट देणार असून यावेळीही समस्त मराठा समाजाने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे त्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन यावेळी बंडू ननवरे यांनी केले.
What's Your Reaction?