भल्या भल्याचं सरकार उलटी केली, ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही : माजी मंत्री महादेव जानकर 

Oct 13, 2025 - 08:31
Oct 13, 2025 - 08:32
 0  445
भल्या भल्याचं सरकार उलटी केली, ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही : माजी मंत्री महादेव जानकर 

आय मिरर 

रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील शेतकरी कर्जमुक्ती एल्गार मेळाव्यात सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार वर त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून राजकीय स्थैर्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सडेतोड भूमिका घेतली. “भल्या भल्याचं सरकार आम्ही उलथावली आहेत... हे सरकार उलथवायला पण जास्त वेळ लागणार नाही,” असा इशारा त्यांनी सध्याच्या सरकारला दिला आहे.

 “सांगोल्यात तीस ते पस्तीस हजारांची परिषद”

जानकर म्हणाले की,23 किंवा 24 तारखेला सांगोल्यात आम्ही एक मोठी परिषद आयोजित करतो आहोत. या परिषदेसाठी तीस ते पस्तीस हजार लोकांचा जमाव अपेक्षित आहे. त्यासाठी आमचा सगळा बंदोबस्त सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आणि रासप या तिन्ही संघटना एकत्र येऊन ताकद दाखवण्याचं काम करत आहेत. माणसं कमी असली तरी आमची ताकद कमी नाही. अस ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही पाच माणसांनी सरकार बदलली आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही काल चंद्रपूर, नागपूर इथून रात्री प्रवास करून आलोय. आम्ही खचून जाणारे नाही, लढत राहणारे आहोत.”

 “शेतकऱ्यांच्या नावावर मतं घेतली, पण मदत दिली नाही”

जानकर यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नावावर मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं. पण शेतकऱ्यांना दिलासा नाही. विधानसभेत मुख्यमंत्री मोठमोठी भाषणं देतात — ‘शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू’ असं म्हणतात. पण कोणी विचारावं, खरंच सातबारा कोरा झाला का?”

ते पुढे म्हणाले, “सोयाबीनच्या एका एकरावर 22 हजार खर्च येतो, आणि सरकार म्हणतं आम्ही साडेआठ हजार रुपये देतो. नदीकाठची जमीन वाहून गेली तर सहा लाखांचा खर्च येतो, पण सरकार फक्त 47 हजार रुपये देते. असं करून शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? पश्चिम महाराष्ट्रातील नेते मोठे झाले, आणि शेतकरी भिकारी झाले.”

“मी मंत्री असताना भारतात सर्वाधिक दुधाला दर दिला”

आपल्या मंत्रीपदाच्या काळाचा उल्लेख करत जानकर म्हणाले, “मी दूध विकास मंत्री असताना भारतात सर्वाधिक दुधाला दर दिला होता. त्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आज मात्र दुधाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. सरकारच्या नितीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास उडालाय.”

“शिवरायांचं नाव घेणारे पण जनतेकडे दुर्लक्ष करणारे सरकार”

इतिहासाचा दाखला देत जानकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा राजांनी सगळ्यांचा पगार बंद केला, पण जनतेला सुख दिलं. आज मात्र हे सरकार शिवरायांचं नाव घेतं, पण राज्य कोणाचं चालतंय हे जनतेला विचारायची वेळ आली आहे.”

“हुशार तालुका तोच, जो आमदार बदलतो”

स्थानिक राजकारणावर भाष्य करत ते म्हणाले, “ज्या तालुक्याचा आमदार प्रत्येक पाच वर्षांनी बदलतो तो तालुका हुशार. पण ज्या तालुक्याचा आमदार 35 वर्षं राहतो तो तालुका गुलाम बनतो. आता शेतकऱ्यांनी आणि जनतेने जागं व्हायचं आहे. लोकांमध्ये फिरून जागृती करण्याचं काम आम्ही करत आहोत.”

 “आम्ही दोघं फिरतोय, सहा टक्के मतं कमी केली तरी सरकार पडेल”

राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी थेट इशारा दिला. “काँग्रेसला वाटत होतं की राज्यातील सत्ता कुणी घेऊ शकत नाही, पण घालवणारे आम्हीच होतो. आता या मुख्यमंत्र्यांना वाटतंय आमचं सरकार सुरक्षित आहे — पण आम्ही आणि बच्चूभाऊ महाराष्ट्रभर फिरतोय. आम्ही फक्त सहा टक्के मतं कमी केली, तरी ह्या सरकारचं गडगडल्याशिवाय राहणार नाही.”

“जनतेला जागं करण्यासाठी फिरतोय”

भाषणाच्या शेवटी जानकर म्हणाले,लोकांमध्ये फिरण्याचं, जागृतीचं काम आम्ही करतोय. कारण निवडणुकीच्या वेळी हे लोक गोडगोड बोलतात, पण नंतर शेतकऱ्यांना दर, मदत, न्याय काहीच देत नाहीत. म्हणूनच आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगतो — ‘जागं व्हा, विचार करा आणि न्याय मागा. महादेव जानकर यांनी इंदापूरच्या सभेतून आगामी सांगोला परिषद, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा आणि सत्ताधाऱ्यांना दिलेला थेट इशारा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow