जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची असेल- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
आय मिरर(देवा राखुंडे)
जगात भारताची सध्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा विश्वा भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत व इंदापूर नगरपरिषद इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 10 जानेवारी रोजी इंदापूर शहरातील 100 फुटी रोड येथील नवीन नगरपरिषद कार्यालयाशेजारी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' विकसित भारत संकल्प यात्रा इंदापूर तालुक्यातील 96 गावात पोहचली आहे .विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पुढील 25 वर्षाचा आराखडा तयार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारताला जगामध्ये विकसित करण्यासाठी, जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी ही संकल्प यात्रा गावोगावी गोरगरीब व्यक्ती, महिलांसाठी,अल्पसंख्यांक वर्ग , युवक, गाव आणि शहराच्या विकासासाठी राबवित असलेल्या योजनांच्या जनजागृती या यात्रेच्या माध्यमातून करीत आहे. मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घेऊन भारताला सक्षम राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, दायित्व व जबाबदारी लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी इंदापूर नगरपालिकेची 25 एकर जमीन एक रुपयात देण्यासाठी मी मंत्रिमंडळात असताना विरोध केला.याची मला राजकीय किंमत मोजावी लागली असली तरी आपण ज्या पदावर काम करतो हे आपले दायित्व आहे सामान्य माणसाच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्रास होता कामा नये यासाठी सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी मी जबाबदारीने हे कार्य पार पाडले यामुळेच येथे इंदापूर नगरपालिकेची नवीन सुसज्ज इमारत , प्रशासकीय भवन, देशातील सर्वात मोठे 3 कोटी रुपयांचे योग भवन, 100 फुटी रोड ,शॉपिंग सेंटर, ज्येष्ठांसाठी नागरिक भवन यासारखी मोठी विकास कामे येथे करता आली.
तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनेच्या लाभाचे किट व प्रमाणपत्र देण्यात आली.औक्षणी मते यांनी उपस्थितांना विकसित भारत बनविण्यासाठीची शपथ दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पुंडे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे , उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, कैलास कदम , शेखर पाटील,भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद आद्यी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.
What's Your Reaction?