भवानीनगरात बच्चू कडूंचा शेतकऱ्यांसाठी एल्गार ! लुटणाऱ्यालाच मत देणं थांबवा : बच्चू कडू 

Oct 13, 2025 - 09:44
 0  304
भवानीनगरात बच्चू कडूंचा शेतकऱ्यांसाठी एल्गार ! लुटणाऱ्यालाच मत देणं थांबवा : बच्चू कडू 

आय मिरर 

भवानीनगर येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर घणाघाती टीका केली. “एका बाजूला अजित पवार, दुसऱ्या बाजूला दत्ता भरणे बसले आहेत आणि मध्ये शेतकरी लुटला जातोय!” अशा शब्दांत त्यांनी व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केला.

कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या मतदारसंघातील कारखान्याने २८०० रुपये प्रति टन ऊसदर देतात अशी टीका करत कडू म्हणाले,“केंद्र सरकारने एफआरपी ३५५० रुपये ठरवली आहे, पण कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातच २८०० मिळत असतील तर बाकी ठिकाणी काय होत असेल? ते पुढे म्हणाले, “मामा काहीच बोलत नाहीत, तर मामीला सांगावं की दादाला सांगावं, बोललं पाहिजे ना.

सोनाई डेअरीचा उल्लेख करत कडू म्हणाले, “शेतकऱ्याकडून २८ ते ३२ रुपयांनी दूध घेतात आणि ६० रुपयांनी विकतात. एवढा फरक असताना कृषीमंत्री गप्प का आहेत? “जो लुटतो त्यालाच मत देणं ही पश्चिम महाराष्ट्रातली चांगली व्यवस्था झाली आहे. लुटणारा तोच आणि निवडून येणारा तोच!” अशा शब्दांत त्यांनी जनतेच्या राजकीय मानसिकतेवर थेट प्रहार केला.

अजित पवारांवर टोला...

कडू म्हणाले, “अजित दादाची दादागिरी कुठे गेली? वित्तमंत्री असून तुम्ही म्हणता पैशाचं सोंग करता येत नाही, पण सोंग करण्यात तुम्ही पटाईत आहात. सकाळी सातला उठून शपथ घेतली, एवढं सोंग कोणी केलं नाही.”त्यांनी पुढे आरोप केला की “शक्तीपीठ मार्ग आणि सुरजगड प्रकल्पांसाठी ८५ हजार कोटी रुपये खर्च केले, पण शेतकऱ्यांसाठी पैसा नाही म्हणता!”

ओबीसी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी या समाजांना एकमेकांशी भिडवून सरकार शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, “जातीसाठी पेटता पण शेतकरी म्हणून पेटत नाही, म्हणूनच सरकार आपल्यावर अन्याय करते.

पंजाबचा शेतकरी लढला म्हणून मोदींना तीन कायदे मागे घ्यावे लागले. पण महाराष्ट्राचा शेतकरी शांत बसतो,” असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.

कडू म्हणाले, “भाजपच्या कार्यालयातच निवडणुका होत आहेत. लोकशाहीत हुकूमशाही वाढली आहे. या व्यवस्थेत कार्यकर्ते गुलाम झालेत, मतदार मेलाय आणि नेता जगतोय.”

बोगस बियाण्यांबाबत थेट आरोप करताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात १५ टक्के बोगस बियाणे मिळतात आणि ती बियाणं गुजरातमधून येतात. गुजरातमध्ये मात्र एक टक्काही बोगस बियाणं मिळत नाही.”“देवीसमोर बोकड कापतात तशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. पक्ष कुठलाही असो, सगळे कापतात. शेतकरी म्हणून पेटा, नाहीतर ही लूट थांबणार नाही,” अशा इशारा देतं कडूंनी सभा संपवली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow