सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर मार्गावर हिंगणगावात रस्ता रोको

आय मिरर (देवा राखुंडे)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी दि.२४ फेब्रुवारी रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगांव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकराच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी बैलगाडी सह महिला,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदापूर पोलिसांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.पुणे व सोलापूर मार्गाकडून येणारी वाहतूक यावेळी ठप्प झाली होती.
मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आतुन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासोबतच राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आले.यावेळी एक मराठा लाख मराठा,कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान रास्ता रोको संदर्भातील सकल मराठा समाजाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी तहसिलदार यांच्या वतीने नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांना तर इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा लढा सुरू असून महाराष्ट्रात आरक्षणासाठी तब्बल आतापर्यंत 58 मोर्चे करण्यात आले.त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आरक्षणाची ठिणगी पेटली असुन जरांगे पाटीलांनी लाखोंची फौज घेऊन मुंबईवर चाल करीत वाशीवरच सरकारचे नाक दाबले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करीत सगळेसोयरे या शब्दाची अधिसूचना काढली. मात्र या अधिसूचनेचे अध्याप पर्यंत कायद्यात रूपांतर झाले नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार केला आहे.
24 फेब्रुवारीपासून सकल मराठा समाजाने आपापल्या भागात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत रास्ता रोको करत सरकारला जेरीस आणण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटलांच्या आव्हानाला जागोजागी मराठा समाज आता समर्थन देताना पाहायला मिळत आहे.
What's Your Reaction?






