गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारण्याचा प्रकार,इंदापूरात उघड झाला रेशनचा काळाबाजार
आय मिरर
पुण्याच्या इंदापूरात रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एस टी महामंडळाच्या महाकार्गो वाहनातून अत्यावश्यक वस्तु अधिनियम खालील असणारा 1 लाख 69 हजार 200 रूपये किमतीचा स्वस्त धान्य दुकानातून काळ्याबाजारात जाणारा तांदूळ आणि 5 लाख रुपये किमतीचे एस टी महामंडळाचे महाकार्गो वाहन ताब्यात घेत इंदापूर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
चक्क एसटी महामंडळाच्या मालवाहतूक वाहनातूनच रेशन धान्याची परस्पर वाहतूक व विक्री होत असून रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघड झाल्याने इंदापूरात एकच खळबळ उडाली आहे.सोमवारी दि.०८ रोजी रात्री याबाबत महसूल व पोलिस प्रशासनाकडून रात्री उशीरा कारवाई करण्यात आली.गुन्ह्याचा अधिक तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गरड हे करीत आहेत.
या प्रकरणी सोमवारी दि.०८ जानेवारी रोजी रात्री इंदापूर पोलिस ठाण्यात इंदापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक संतोश निषीकांत अनगरे यांच्या फिर्यादीनुसार भा.द.वि.कलम 420,406,34 अत्यावश्यक वस्तु कायदा कलम 1955 चे कलम 3 व 7 नुसार शैलेश अशोक ढोले रा. रामदासपथ मेनरोड इंदापुर आणो गणेश होळकर रा. सावतामाळीनगर इंदापुर व शिवाजी पवार रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीसांनी 1 लाख 69 हजार 200 रूपये किंमतीच्या तांदळाने भरलेल्या पन्नास किलो वजनाच्या एकुण 188 गोण्या आणि 5 लाख रुपये किमतीची महा कार्गो बस क्रमांक MH 07 C 7440 असा एकूण 6 लाख 69 हजार 200/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,इंदापूर शहरातील धान्याची एक ट्रेडिंग कंपनी अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कार्गो सेवेच्या माध्यमातून मालवाहतूक करते. त्यामध्ये रविवारी दि. ७ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या संबंधित ट्रेडिंग कंपनीच्या गोदामामधून शासनाची महाकार्गो मालवाहतुक गाडी धान्य घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघणार होती. यावेळी इंदापूर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्या वाहनावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये चक्क रेशनचे धान्य आढळून आले. त्यानंतर पुरवठा विभाग आणि पोलीसांनी एकत्रीत कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल करीत सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?