वडापुरीत गर्भवती विवाहितेची आत्महत्या ! पती आणि सासर्‍याला पोलिसांनी केली अटक...

Sep 4, 2026 - 12:38
Sep 4, 2026 - 12:43
 0  633
वडापुरीत गर्भवती विवाहितेची आत्महत्या ! पती आणि सासर्‍याला पोलिसांनी केली अटक...

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे साडेपाच महिन्यांची गरोदर असलेल्या विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत पिडीतीच्या पती आणि सासर्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. सोनाली समाधान चंदनशिवे वय २१ वर्षे राहणार वडापुरी (ता. इंदापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

इंदापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत श्रीपती बनसोडे (वय ४५, व्यवसाय - मजुरी, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की ,माझी मोठी मुलगी सोनाली हिचे लग्न मौजे वडापुरी येथील समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे याच्यासोबत दि. 23/11/2025 रोजी रितीरिवाजाप्रमाणे केले होते. लग्न जमवताना आरोपींनी एक लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती, ती पूर्ण करता आली नव्हती.

लग्नानंतर काही दिवस सासरच्यांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासू पार्वती ही "तुला घरातील काम येत नाही, तू आराम करतेस, माझ्या कार्तिकचे वाटोळे केलेस, तुझ्या बापाला हुंडा देता आला नाही" असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करू लागली. पती समाधान हा संशय घेऊन "तू माझ्या आयुष्यात का आलीस" असे म्हणून मारहाण करत होता. सासरा गौतम हाही पत्नीच्या सांगण्यावरून घालून-पाडून बोलून मारहाण करत होता. या त्रासामुळे मी मुलीला 3 ते 4 वेळा माहेरी घेऊन गेलो होतो.

03 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजता जावई समाधानने फोन करून "सोना कसतरीच करतेय, लवकर या" असे सांगितले. त्यानंतर नातेवाईक कुंडलीक माने याने फोनवर सांगितले की, सोनालीला इंदापूर सरकारी दवाखान्यात नेले आहे. तेथे गेल्यावर डेड हाऊसमध्ये तिचा मृतदेह आढळला, गळ्यावर व्रण होते. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. ती साडेपाच महिन्यांची गरोदर होती.

तिचे पती, सासू, सासऱ्याने शारीरिक व मानसिक त्रास देऊन हुंड्यासाठी जाचहाट करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेविषयी माहिती देताना इंदापूरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे म्हणाले, यातील आरोपी पती आणि सासरे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow