शिक्रापूर पोलिसांचा धडाका ! चोरी गेलेले २९ मोबाईल शोधले

Oct 17, 2026 - 10:53
Oct 17, 2026 - 10:54
 0  25
शिक्रापूर पोलिसांचा धडाका ! चोरी गेलेले २९ मोबाईल शोधले

आय मिरर

हरवलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा सोडलेल्या नागरिकांना शिक्रापूर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. विविध कारणांमुळे हरवलेले आणि गहाळ झालेले तब्बल २९ मोबाईल फोन शोधून काढत सुमारे १४ लाख रुपये किमतीचे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी तपासाच्या जोरावर शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन २०२६ मध्ये मोबाईल हरविण्याच्या आणि गहाळ होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकातील तांत्रिक विश्लेषणाचे काम पाहणारे पोलीस हवालदार शिवाजी चितारे यांना हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.

हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलचा वापर केला. पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित मोबाईलची माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून मोबाईलचा माग काढत एकूण २९ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

सुमारे १४ लाख रुपये किमतीचे हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

मोबाईलमध्ये महत्त्वाचे संपर्क क्रमांक, वैयक्तिक माहिती आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित तपशील असतात. त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत तांत्रिक कौशल्याचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची शिक्रापूर पोलिसांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी शिक्रापूर पोलीस कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून दिसून आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलीस हवालदार शिवाजी चितारे नारायण वाळके विकास नगर यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. हरवलेले २९ मोबाईल शोधून १४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देत शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या विश्वासाला अधिक बळ दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow