सोमेश्वर च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार चौथा अंक ; जगतापांच्या बंडखोरीने भाजपचीही मैदानात
आय मिरर
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वतंत्र 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलची घोषणा युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे.
सुरुवातीला आम्ही स्थिर होतो आताही आम्ही स्थिर आहोत आणि चांगले तगडे उमेदवार आमच्या पॅनल मध्ये आहेत. ही निवडणूक पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करू असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील पॅनेल देण्यात आलेलं आहे.आमचा पॅनल पवार साहेबांच्या पक्षाचा पुरस्कृत पॅनल आहे.सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल हे आमच्या पॅनलचं नाव आहे.आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत. आमची अगोदर जी भूमिका होती तीच आता ही आहे,वेगळं काही करत नाही. असे युगेंद्र पवार म्हणाले.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केलेल्या बंडखोरीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला पाठिंबा दिलेला नाही.आम्हीच त्यांना तिथे पाठवलं होत असं युगेंद्र पवार म्हणाले.
ते तिथे पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा करत होते. आपण सर्वांशी चर्चा करू शकतो, तिथं जाणं ही चुकीचं किंवा गैर नाही ते मला सांगून गेलेत. असही योगेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं.
बारामतीत पवार विरुद्ध पवार चौथा अंक...
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीसोबत भाजप देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहे. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार आहे.
बारामती मध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार चौथा अंक होणार आहे. यापूर्वी देखील 2024 ची लोकसभा त्यानंतर पार पडलेली विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या तीनही निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला होता. मात्र या वेळच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार संघर्षात भाजपने देखील उडी घेतली असल्याने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आपली पकड कायम ठेवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी आव्हान असणार आहे.
जगतापांची बंडखोरी भाजप मैदानात...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल याबाबत अनेकांना आशा होती, मात्र अखेर असं झालं नाही. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर उतरल्या असून भाजपने देखील बारा वर्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम जगताप यांना राष्ट्रवादीतून गळाला लावत बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभा केला आहे.
जगताप असं काहीतरी करतील वाटलं नव्हतं : जय पवार
शिवसेना शिंदे गटाने मात्र सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे बंड थोपवण्यात सुनेत्रा पवारांना यश आलं.पुरुषोत्तम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेवर मात्र जय पवारांनी सपशेल नाराजी व्यक्त केली.पुरुषोत्तम जगताप हे अध्यक्ष आहेत त्यांना देखील दादांनी कायम साथ दिली. पण ते असं काहीतरी करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं असं म्हणत जय पवार यांनी खंत ही व्यक्त केली.
What's Your Reaction?