शहा ग्लोबल स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा
आय मिरर
लोप पावत चाललेली संस्कृती, वाढती धावपळीची जीवनशैली आणि वाढत चाललेल्या न्यूक्लिअर कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबांशी असलेले भावनिक नाते आणि सहवास कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आजी-आजोबांचे मुलांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथे आजी-आजोबा दिन उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांनी आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आजी-आजोबांचे असलेले महत्त्व स्पष्ट करत, त्यांच्या अनुभवातून आणि संस्कारातून पुढील पिढीला मिळणाऱ्या समृद्ध वारशाविषयी मनोगत व्यक्त केले. आजी-आजोबांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची, पुस्तक संतुलन आदी खेळांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आजी-आजोबा आणि त्यांच्या नातवंडांसाठी गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मातीच्या गोळ्याला आकार देत आपल्या हातांनी गणपतीची सुंदर मूर्ती साकारताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते.
या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करताना अनेक आजी-आजोबांनी, “आज आम्ही पुन्हा आमचे बालपण अनुभवले. कधी हातात माती घेतली नव्हती; मात्र आज नातवंडांसोबत गणपतीची मूर्ती साकारण्याचा आनंद मिळाला. हा सुंदर अनुभव आम्हाला दिल्याचे श्रेय शहा ग्लोबल स्कूलला जाते,” अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान शहा ग्लोबल स्कूलच्या व्यवस्थापन सदस्या रुचिरा शहा यांनी आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या उपक्रमाचा सर्वात मोठा आनंद असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “आज या उपक्रमातून आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळाला, तो आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यांच्या प्रेमाची आणि अनुभवांची शाळेला नेहमीच साथ लाभावी, हीच अपेक्षा आहे.”
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आशा मॅडम आणि राजश्री पाटील मॅडम यांनी केले, तर कल्याणी यादव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आकर्षक सजावट उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
या प्रसंगी शाळेच्या व्यवस्थापनातील मालती शहा, मुकुंद शहा, अंकिता शहा, अंगद शहा आणि रुचिरा शहा उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेम, जिव्हाळा व संस्कारांची नाळ अधिक दृढ करणारा हा उपक्रम अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
What's Your Reaction?