तो शिक्रापूर पोलिसांच्या हाती लागला अन् तब्बल १६ तोळे सोने लागले हाती ! दीपकवर घरफोडीचे तब्बल 14 गुन्हे
आय मिरर
बंद घरांवर पाळत ठेवायची, संधी साधून कुलूप तोडायचे आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशा पद्धतीने घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याचा अखेर सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात बहिणीकडे लपून बसलेल्या दिपक भिमराव दांडगे (२५) याला शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा तब्बल २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी केवळ संशयितांची यादी न करता प्रत्येक घटनेची वेळ, ठिकाण, चोरट्यांची पद्धत आणि घटनांमधील साम्य यांचा बारकाईने अभ्यास सुरू केला.
घरफोडीच्या ठिकाणांपासून आसपासच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. फुटेजमधील हालचाली आणि तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांच्या तपासाला एक महत्त्वाचा धागा मिळाला. गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली. अखेर घरफोडी करणारा संशयित अमरावती जिल्ह्यातील कविठा येथे आपल्या बहिणीकडे राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांचे पथक अमरावतीकडे रवाना झाले. कविठा परिसरात सापळा रचून दिपक दांडगे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शिक्रापूर व शिरूर परिसरातील घरफोड्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकशीतून शिक्रापूर पोलीस ठाणे आणि शिरूर पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा २४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे शिक्रापूर आणि शिरूर परिसरातील घरफोडीच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, आरोपीने महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातही अशाच प्रकारच्या घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून तो सध्या शिक्रापूर पोलिसांच्या कोठडी रिमांडमध्ये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार आणि शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर शिक्रापुर पो स्टे कडील धनंजय थेऊरकर, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, मच्छिद्र निश्चित, नारायण वाळके,राम जाधव,भारत भोसले, अस्मिता जोंधळे
स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली.
What's Your Reaction?