नुकसानीच्या पंचनाम्यांना थोडा विलंब होतोय पण मदत नक्की ! हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे याचं आश्वासन

Oct 24, 2025 - 09:40
Oct 24, 2025 - 09:49
 0  254
नुकसानीच्या पंचनाम्यांना थोडा विलंब होतोय पण मदत नक्की ! हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे याचं आश्वासन

आय मिरर 

राज्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारे आश्वासन दिलं आहे. “पंचनाम्यांना थोडा उशीर होतोय, हे खरं आहे. पण यंत्रणा कुठेही कमी पडलेली नाही. नुकसान भरपाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे,हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे” असं भरणे यांनी स्पष्ट केलं.

भरणे म्हणाले, “एनडीआरएफचा नियम दोन हेक्टरचा होता तो आता तीन हेक्टरचा करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागले. माहिती संकलनाचं काम सुरू आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागत आहे.”

राज्य सरकारने आतापर्यंत सुमारे ८ हजार ४०० कोटी रुपयांचा मदतीचा जीआर जाहीर केला असून उर्वरित रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. “केंद्र सरकारला नुकसान भरपाईची अचूक माहिती देण्यासाठी प्रक्रिया काटेकोरपणे केली जाते, त्यामुळे थोडा उशीर होतो. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

हवामान बदलाचा परिणाम – नवीन योजना तयार

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख करताना भरणे म्हणाले, “आता एकाच दिवशी वर्षभराच्या सरासरीएवढा पाऊस पडतोय. त्यामुळे नद्या-नाले तुडुंब भरत आहेत आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित राहावं, यासाठी शासनाकडून नवीन योजना आखल्या जाणार आहेत.”

कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय होईल

माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना भरणे म्हणाले, “शेतकरी सध्या अडचणीत आहे. त्याला उभं करण्याची गरज आहे. कर्जमाफीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.”

वंजारी समाजाच्या आरक्षण मागणीवर प्रतिक्रिया

वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत विचारले असता भरणे म्हणाले, “आरक्षण हा कायदेशीर विषय आहे. कायद्याची बाजू तपासून योग्य तेच निर्णय घेतले जातील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर योग्य ती दिशा ठरवतील.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – महायुती एकत्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना भरणे यांनी स्पष्ट केलं की, “जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. मात्र ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचे मत विचारात घेऊन वेगळ्या लढतीचा विचार केला जाऊ शकतो.”

“बर्‍याच ठिकाणी तीनही पक्षांचे कार्यकर्ते ताकदवान आहेत. अशा वेळी मैत्रीपूर्वक लढत होईल. मात्र वरच्या निवडणुकांसाठी सर्वजण पुन्हा महायुती म्हणून एकत्र येतील,” असं भरणे म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस यांनीच राज्याचं नेतृत्व करावं’

राज्यातील नेतृत्वाबाबत विचारले असता भरणे म्हणाले, “यात दुमतच नाही की, देवेंद्र फडणवीस यांना आमदारांचा मोठा पाठिंबा आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांनीच राज्याचं नेतृत्व करावं, ही आमची सर्वांची भावना आहे.”

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टी, शेतकरी मदत, आरक्षण, आणि महायुती निवडणूक रणनिती अशा विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की,“शेतकऱ्याला उभं करणं हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे.”

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow