सातारा हादरला ! माझ्यावर बलात्कार झालाय, पोलिसांवर गंभीर आरोप : हातावर मजकूर लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या ; मुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश
आय मिरर
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर "माझ्यावर बलात्कार झाला" असा मजकूर लिहिलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचे लिहिले आहे. पोलीस निरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला डॉक्टरने नेमकं काय लिहिलं आहे?
पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली होती. या सर्व घडामोडींमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
"माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन"
महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत म्हटले होते की, "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन." मात्र, त्यांच्या या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरु आहे. गुरुवारी रात्री फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलच्या खोलीत डॉ. मुंडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात आणि आरोग्य विभागात शोककळा पसरली आहे. मात्र, आता त्यांच्या हातावर "माझ्यावर बलात्कार झाला" असा मजकूर सापडल्याने आत्महत्येच्या मागील कारणांबाबत नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता केवळ आत्महत्या म्हणून नव्हे तर संभाव्य अत्याचार आणि दबावाच्या अँगलने सुरू केला आहे. तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, मृत्यूमागील खरी कारणमीमांसा उघड करण्यासाठी सर्व पुरावे आणि दस्तऐवज तपासले जात आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
ही घटना धक्कादायक म्हणण्यापेक्षा अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे… एखाद्या व्यक्तीला इतकं टॉर्चेर केलं जातं आहे आणि तीन महिन्यांपासून कोणतीच मदत उपलब्ध होत नाही…. मदत उपलब्ध झाली असती तर, जे अघटीत पाऊल डॉक्टर तरुणीने उचललं आहे, ते उचललं गेलं नसतं… आत्महत्या हा काही पर्याय असू शकत नाही.. हे आपल्यासाठी म्हणणं सोपं आहे आणि तो असू ही शकत नाही हे देखील बरोबर आहे..
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? त्या जबाबदारीबद्दल काहीच बोललं जात नाही. आता कदाचित चौकश्या होतोल पोस्टमार्टम होईल… तारखेवर तारखा पडत राहतील, पण मुळ मुद्दा मात्र तसाच राहील… कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत आहेत. डॉक्टर तरुणीचा बळी जाण्याचं कारण कायद्याचे रक्षक असतील तर दाद कोणाकडे मागायची.. असा प्रश्न देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई
जेव्हा मला घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी ताबडतोब एसपी आणि ऍडिशनल एसपी यांच्याबरोबर बोललो आहे. सगळे पुरावे हाती यावे या दृष्टीने कारवाईची सुरुवात केली आहे. अटक सत्र सुरु करण्याचे देखील आदेश दिले आहेत. पोलीस देखील त्याच कामाला लागले आहे. ज्या कोणाचं नाव समोर आलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण सर्व पुरावे ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. नराधमावर कारवाई करण्याच्या सर्व सूचना मी दिल्या आहेत. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर
फलटण येथील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट सापडली आहे दोन पोलिस आधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलिस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल… जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल… असं वक्तव्य गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं आहे.
What's Your Reaction?