इंदापूरात आज होणार 'जागर सौभाग्याचा' समाजातील विधवा भगिनिंना मिळणार हळदी कुंकू आणि वाण लुटण्याचा मान
आय मिरर(देवा राखुंडे)
दुर्दैवाने पतीचे निधन झालेल्या समाजातील विधवा भगिनींनाही हळदी कुंकू आणि वाण लुटण्याचा मान देण्याच्या उद्देशाने इंदापूर येथे "जागर सौभाग्याचा" या उपक्रमाचे आयोजन गुरुवार (ता.15) रोजी करण्यात आले आहे.अशी माहिती कामधेनू परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी दिली.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुरुप भारतीय संस्कृतीमध्ये पौष महिना हा सुवासिनींच्या उत्साहाचा महिना समजला जातो या महिन्यांमध्ये सौभाग्यवती असणाऱ्या स्त्रिया अनेक ठिकाणी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात हा महिना जसा सुवासिनींच्या आनंद उत्सवाचा महिना समजला जात असताना ज्यांचे अल्पवयात किंवा दुर्दैवी घटनेमुळे पती गेलेले आहेत अशा बहिणींसाठी हा महिना दुःखाचा अनुभव देऊन जात असतो. याबाबत जनजागृती होण्यासाठी समाजाने अशा माता भगिनींना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी व अशा स्त्रियांच्या जीवनातून विधवा या शब्दाला कायमची तिलांजली देण्यासाठी सामाजिक आणि शासकीय स्तरावर एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार आहेत.यासाठी जागर सौभाग्याचा या अंतर्गत अशा सर्व माता-भगिनींना कामधेनू सेवा परिवार, पतंजली योग परिवार ,शिवभक्त परिवार, लिनेन्स क्लब, सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट,इंदापूर महिला भजनी मंडळ, अंगणवाडी सेविका समिती, मैत्रीण ग्रुप, महिला बचत गट, ब्रह्मचैतन्य संकुल ,स्वामी समर्थ ट्रस्ट, राजमाता ग्रुप ,साई महिला स्वयंरोजगार संस्था व देविका बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (ता.15) रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये सिद्धेश्वर मंदिर इंदापूर येथे हळदी कुंकवाचे वाण वाटण्याचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील माता-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी केले.
What's Your Reaction?